कबड्डी खेळाची माहिती मराठी

कबड्डी खेळाची माहिती मराठी – Kabaddi Information in Marathi

कबड्डीसाठी गट

 1. पुरुष – ८० कि.ग्रॅ. वजनाखालील
 2. महिला – ७० कि.ग्रॅ. वजनाखालील
 3. कुमार मुले − वय २० वर्षे व त्याखालील आणि ६५ कि.ग्रॅ. वजनाखालील
 4. कुमार मुली − वय २० वर्षे व त्याखालील आणि ६० कि.ग्रॅ. वजनाखालील
 5. किशोर मुले − वय १६ वर्षे व त्याखालील आणि ५० कि.ग्रॅ. वजनाखालील
 6. किशोर मुली − वय १६ वर्षे व त्याखालील आणि ५० कि.ग्रॅ. वजनाखालील

कबड्डीसाठी क्रीडांगण

 1. १३ मी. × १० मी. (पुरुष व कुमार मुले)
 2. १२ मी. × ८ मी. (महिला‚ कुमार मुली)
 3. ११ मी. × ८ मी. (किशोर मुले व किशोर मुली)

कबड्डी क्रीडाक्षेत्र

 1. राखीव क्षेत्र वगळता राहिलेला क्रीडांगणाचा भाग
 2. १३ मी. × ८ मी. (पुरुष व कुमार मुले)
 3. १२ मी. × ६ मी. (महिला‚ कुमार मुली‚ किशोर मुले व किशोर मुली)

कबड्डी राखीव क्षेत्र

कबड्डी क्रीडांगणाच्या दोन्ही बाजूंना असणारे १ मी. रुंदीचे क्षेत्र.

कबड्डी मध्य रेषा

क्रीडांगणाचे दोन समान भाग करणारी रेषा.

कबड्डी निदान रेषा

 1. मध्यरेषेशी समांतर व मध्यरेषेपासून ३.७५ मी. / ३ मी. अंतरावर दोन्ही क्रीडाक्षेत्रांत आखलेल्या रेषा.
 2. ३.७५ मी. – पुरुष व कुमार मुले
 3. ३ मी. – महिला‚ कुमार मुली‚ किशोर मुले व किशोर मुली.

कबड्डी बोनस रेषा

निदान रेषांशी समांतर व निदान रेषांपासून मागील अंतिम रेषांच्या बाजूस १ मी. अंतरावर क्रीडाक्षेत्रात आखलेल्या रेषा.

टीप –

 1. क्रीडांगणावरील सर्व रेषांची जाडी ३ ते ५ सें.मी. असते.
 2. अंतिम मर्यादा रेषा क्रीडांगणाचाच भाग असतात.
 3. अंगणाच्या पाठीमागे २ मी. अंतरावर असलेल्या जागेत बाद झालेले खेळाडू बसतात. (बाकांची व्यवस्था असावी)
 4. अंतिम रेषांच्या बाहेर चार मीटर मोकळी जागा असावी.

कबड्डी खेळाचे नियम

१) नाणेफेक जिंकणारा संघ‘अंगण’ किंवा ‘चढाई’ यांपैकी एका पर्यायाची निवड करील.

२) दुसऱ्या डावात अंगणांची अदलाबदल करावी. पहिल्या डावात ज्या संघाने प्रथम चढाई केली असेल‚ त्याच्या प्रतिस्पर्धी संघाचा खेळाडू दुसऱ्या डावात प्रथम चढाई करील.

३) वीस मिनिटांचा / पंधरा मिनिटांचा पहिला डाव संपताना प्रत्येक संघाचे जितके खेळाडू प्रत्यक्ष अंगणात खेळत असतील‚ त्याच खेळाडूंनी दुसरा डाव सुरू करावयाचा असतो.

४) चढाई करणाऱ्या खेळाडूने मध्यरेषा ओलांडण्यापूर्वी दम घालण्यास सुरुवात करावी.

५) चढाई करणाऱ्याने दम घालताना एकाच श्वासात (cant) ‘कबड्डी’ ‘कबड्डी’ असा स्पष्ट शब्दोच्चार केला पाहिजे. दम स्पष्ट नसेल‚ तर पंचाने त्याला ताकीद देऊन परत पाठवावे आणि प्रतिपक्षास चढाई करण्याची संधी द्यावी. ताकीद देऊन परत पाठविलेल्या खेळाडूचा पाठलाग करता येणार नाही. प्रतिस्पर्धी संघास एक तांत्रिक गुण द्यावा.

६) चढाई करताना मध्यरेषा ओलांडल्यावर दम घालावयास सुरुवात केली‚ तर पंचाने चढाई करणाऱ्यास परत बोलवावे आणि त्याला ताकीद द्यावी. त्याची चढाईची पाळी संपली‚ असे सांगून प्रतिपक्षास चढाई करण्याची संधी द्यावी. परत पाठविलेल्या खेळाडूचा पाठलाग करता येणार नाही. प्रतिस्पर्धी संघास एक तांत्रिक गुण द्यावा.

७) एका वेळी एकाच खेळाडूने चढाई करावयाची असते. जर एका वेळी अनेक खेळाडू चढाई करण्यासाठी प्रतिपक्षाच्या अंगणात जात असतील‚ तर पंचाने त्यांना आपल्या अंगणात परत पाठवावे आणि त्या संघाची चढाईची पाळी संपल्याचे सांगावे. अशा वेळी परत पाठविलेल्या खेळाडूंचा पाठलाग करता येणार नाही. प्रतिस्पर्धी संघास एक तांत्रिक गुण द्यावा.

८) आपली चढाईची पाळी नसताना एखादा खेळाडू प्रतिपक्षाच्या अंगणात चढाई करण्यासाठी जात असेल‚ तर त्याला परत बोलावून समज द्यावी. त्याला बाद करू नये. पंचाने प्रतिस्पर्धी संघास एक तांत्रिक गुण द्यावा.

९) चढाई करणाऱ्या खेळाडूने आपल्या अंगणात येईपर्यंत दम सुरू ठेवला पाहिजे. प्रतिस्पर्ध्याच्या अंगणात त्याचा दम गेला‚ तर त्याला बाद करावे.

१०) चढाई करून खेळाडू आपल्या अंगणात परत जाताच किंवा प्रतिपक्षाच्या अंगणात बाद होताच दुसऱ्या संघाच्या खेळाडूने वेळ न दवडता पाच सेकंदांत चढाई केली पाहिजे. चढाई करण्यास अकारण विलंब करणाऱ्या संघाची चढाई करण्याची पाळी संपली‚ असे जाहीर करून प्रतिपक्षास चढाई करावयास सांगावे. चढाईस विलंब करणाऱ्या संघाच्या प्रतिपक्षास एक तांत्रिक गुण द्यावा.

११) चढाई करणाऱ्यास पकडल्यावर त्याचे तोंड किंवा गळा दाबून त्याच्या दमात अडथळा आणला गेला असेल‚ कैची वापरून किंवा अपायकारक उपाययोजना करून चढाई करणाऱ्याची पकड केली असेल‚ तर त्या वेळी चढाई करणारा नाबाद ठरवावा. बचाव पक्षाच्या संबंधित दोषी खेळाडूवर कारवाई करावी. दोषी खेळाडूच्या प्रतिस्पर्धी संघास एक गुण देण्याचा / दोषी खेळाडूस बाद करण्याचा सरपंचास अधिकार आहे.

१२) चढाई करणाऱ्या खेळाडूने किमान एक वेळ तरी प्रतिस्पर्ध्याच्या अंगणातील निदान रेषा ओलांडली पाहिजे व परत आपल्या अंगणात येताना मध्यरेषा ओलांडेपर्यंत त्याचा दम टिकला पाहिजे. (चढाई करणाऱ्या खेळाडूच्या शरीराचा भाग प्रतिपक्षाच्या अंगणातील निदान रेषा व बोनस रेषा यामधील जमिनीस टेकलेला असतो व त्याच वेळी त्याच्या शरीराचा कोणताही भाग निदान रेषा व मध्यरेषा यामधील जमिनीस टेकलेला नसतो; त्या वेळी निदान रेषा ओलांडली‚ असे होते.)

१३) चढाईमध्ये प्रतिपक्षाचा एक किंवा अधिक खेळाडू बाद केले असतील‚ तर त्या वेळी निदान रेषा ओलांडण्याची आवश्यकता नाही. त्या वेळी त्याने मध्यरेषा ओलांडेपर्यंत आपला दम टिकवला पाहिजे.

१४) चढाई करणाऱ्याचा बचाव करणाऱ्या खेळाडूच्या शरीराच्या कोणत्याही भागास किंवा कपड्यास पायातील शूजने किंवा हाताने संपर्क झाल्यास त्याला स्पर्श (ूदल्म्प्) म्हणतात. बचाव करणाऱ्यास स्पर्श करून चढाई करणारा आपल्या अंगणात सुरक्षित आला असेल‚ तर त्याचा पाठलाग करता येतो.

१५) बचाव करणाऱ्याचा जेव्हा चढाई करणाऱ्यास स्पर्श होतो‚ त्या क्रियेस झटापट (struggle) म्हणतात. झटापट होऊन चढाई करणारा खेळाडू आपल्या अंगणात सुरक्षित आला असेल‚ तर त्याचा पाठलाग करता येणार नाही. स्पर्श किंवा झटापट होताच राखीव क्षेत्राचा क्रीडाक्षेत्रात समावेश होतो. झटापट संपल्यानंतर त्यात समाविष्ट असलेल्या खेळाडूंना आपल्या अंगणात प्रवेश करताना राखीव क्षेत्राचा वापर करता येईल. (फक्त बचाव करणाऱ्या संघाच्या अंगणातील क्रियेबाबत हे ग्राह्य धरले जाईल.)

१६) चढाई करणाऱ्या खेळाडूस पकडताना त्याचा हात‚ पाय‚ कंबर याशिवाय शरीराच्या इतर कोणत्याही भागास हेतुपुरस्सर पकडू नये किंवा ओढू नये. जाणूनबुजून त्याचे केस‚ कपडे धरून पकड केली; तर त्याला नाबाद ठरवावे आणि नियमभंग करणारा खेळाडू बाद झाल्याचे जाहीर करावे.

१७) बचाव करणाऱ्यांनी चढाई करणाऱ्यास किंवा चढाई करणाऱ्याने बचाव करणाऱ्यास जाणूनबुजून अंतिम रेषेच्या बाहेर ढकलू नये किंवा ओढू नये. बुद्धिपुरस्सर बाहेर ढकललेल्या किंवा ओढल्या गेलेल्या खेळाडूस नाबाद ठरवावे व बाहेर ढकलणाऱ्या किंवा ओढणाऱ्या खेळाडूस बाद केल्याचे जाहीर करावे.

१८) चढाई करणारा प्रतिपक्षाच्या अंगणात दम घालत असताना बचाव पक्षाच्या खेळाडूने शरीराच्या कोणत्याही भागाने चढाई करणाऱ्याच्या अंगणास स्पर्श केला‚ तर बचाव पक्षाचा तो खेळाडू बाद होतो. अशी चूक करून त्याने चढाई करणाऱ्यास पकडले किंवा पकडण्यास मदत केली‚ तर चढाई करणारा नाबाद राहील आणि प्रतिपक्षाच्या अंगणास स्पर्श करणारा तो खेळाडूच फक्त बाद होईल.

१९) विरोधी संघाचे खेळाडू बाद झाले‚ तर दुसऱ्या संघाचे खेळाडू बाद झालेल्या क्रमांकाप्रमाणे जिवंत होतील.     

२०) एखाद्या संघाचे सर्व खेळाडू बाद झाले आणि त्यांचा कोणीही खेळाडू जिवंत होत नसेल‚ तर त्या संघावर ‘लोन’ होऊन त्या लोनचे प्रतिपक्षाला दोन गुण मिळतात. त्या वेळी जितके खेळाडू बाद झाले असतील तितके गुणही मिळतील. एक-दोन खेळाडू शिल्लक असताना आपले सर्व खेळाडू आत यावेत म्हणून संघनायक त्यांना बाद झाल्याचे जाहीर करू शकतो. त्या वेळी त्या खेळाडूइतके आणि लोणचे दोन गुण प्रतिस्पर्धी संघास मिळतील. त्या वेळी त्या संघातील खेळाडू निलंबित/बडतर्फ असेल‚ तर त्याचाही गुण मिळतो.

२१) लोन जाहीर होताच लोन मिळणाऱ्या संघाचे सर्व खेळाडू दहा सेकंदांत आपल्या अंगणात प्रवेश करतील. वेळेत अंगणात प्रवेश केला नाही‚ तर पंच / मुख्यपंच प्रतिपक्षास एक तांत्रिक गुण बहाल करतील. त्यानंतरही तो संघ अंगणात आला नाही‚ तर त्या संघाला अंगणात येण्याबाबत मुख्यपंच सूचना करतील. त्यानंतर तो संघ एका मिनिटात अंगणात आला नाही‚ तर तो संघ बाद केल्याचे व प्रतिस्पर्धी संघ विजयी झाल्याचे मुख्यपंच घोषित करतील.

२२) खेळ सुरू असताना खेळाडूच्या शरीराच्या कोणत्याही भागाचा अंतिम रेषेच्या बाहेर स्पर्श झाल्यास तो खेळाडू बाद होतो. चढाई सुरू असताना बचाव पक्षाच्या खेळाडूचा अंगणाबाहेर स्पर्श झाला‚ तर त्याला बाद करून तत्काळ बाहेर काढावे. त्याचा क्रमांक सांगून बाद झाल्याचे जाहीर करावे. त्याला बाद करताना शिट्टी वाजवू नये. संबंधित खेळाडू बाद होऊन ती चढाई सुरू राहते. अंगणाबाहेर स्पर्श झालेल्या खेळाडूने चढाई करणाऱ्याची पकड केली असली तरी चढाई करणारा नाबाद राहतो.

२३) झटापटीच्या वेळी राखीव क्षेत्राचा क्रीडाक्षेत्रात समावेश होत असल्याने त्या वेळी खेळाडूचा अंतिम रेषेच्या बाहेर स्पर्श होऊन त्याच्या शरीराचा क्रीडांगणात स्पर्श होत असेल‚ तर तो खेळाडू नाबाद राहील. संपर्क असलेला शरीराचा भाग क्रीडांगणाच्या मर्यादेच्या आत पाहिजे.

२४) चढाई करणाऱ्या खेळाडूस त्याच्या संघातील खेळाडूंनी संभाव्य संकटाबद्दल सूचना केल्यास पंच / मुख्यपंच प्रतिपक्षास एक तांत्रिक गुण देतील.

२५) चढाई करणाऱ्याने प्रतिपक्षाचे सहा किंवा सात खेळाडू त्यांच्या अंगणात असताना बोनस रेषा ओलांडली‚ तर चढाई करणाऱ्यास एक गुण मिळतो. (चढाई करणाऱ्याच्या शरीराचा भाग बोनस रेषा व मागील अंतिम रेषा यामधील प्रतिस्पर्ध्याच्या अंगणात टेकलेला असतो आणि त्या वेळी त्याच्या शरीराचा कोणताही भाग बोनस रेषा व निदान रेषा यामधील अंगणात टेकलेला नसतो‚ त्या वेळी बोनस रेषा ओलांडली‚ असे मानतात.)

बोनस रेषा ओलांडून बचाव पक्षाच्या खेळाडूस स्पर्श करून किंवा झटापट होऊन चढाई करणारा सुरक्षितपणे आपल्या अंगणात आला‚ तर त्याच्या संघास बोनस रेषा ओलांडल्याबद्दल एक गुण आणि जितके प्रतिस्पर्धी बाद झाले असतील तितके गुण मिळतील.

बोनस रेषा ओलांडल्यावर चढाई करणाऱ्याची यशस्वी पकड केली गेली तरी चढाई करणाऱ्या संघास एक बोनस गुण मिळतो. तो पकडीत बाद झाल्याने बचाव पक्षासही एक गुण मिळतो. या वेळी चढाई करणाऱ्याने अगोदर गुण मिळवला‚ अशी नोंद होते.

बोनस गुण मिळाला तरी त्या संघाचा गडी जिवंत होत नाही. निलंबित / बडतर्फ खेळाडूंची संख्या विचारात घेऊन बोनस रेषेचा नियम लागू होईल.


कबड्डी सामन्याचे नियम

१) कबड्डी संघात १२ खेळाडू असतील. त्यांपैकी ७ खेळाडूच अंगणात खेळावयास उतरतील. उरलेले ५ खेळाडू राखीव खेळाडू असतील. सात खेळाडू असताना सामना सुरू होईल.

२) पुरुष व कुमार मुले या गटांसाठी प्रत्येकी २० मिनिटांच्या दोन सत्रांत सामना खेळला जाईल. पहिल्या २० मिनिटांच्या खेळानंतर ५ मिनिटांची विश्रांती राहील. महिला‚ कुमार मुली‚ किशोर मुले आणि किशोर मुली या गटांसाठी प्रत्येकी १५ मिनिटांची दोन सत्रे राहतील. दोन सत्रांमध्ये ५ मिनिटांची विश्रांती राहील.

३) मध्यंतराच्या विश्रांतीनंतर अंगणाची अदलाबदल केली जाईल.

४) सत्रातील शेवटची चढाई सुरू असताना वेळ संपली तरी ती चढाई पूर्ण होऊ द्यावी.

५) प्रतिपक्षाच्या बाद होणाऱ्या प्रत्येक खेळाडूमागे दुसऱ्या संघास एक गुण मिळतो.

६) संघाचे अंगणात खेळणारे सर्व खेळाडू बाद झाल्यावर लोन होईल आणि लोन देणाऱ्या संघास लोनचे दोन गुण मिळतील.

७) संघनायक किंवा मार्गदर्शक सामन्याच्या प्रत्येक सत्रात दोनदा त्रुटित काळाची मागणी करू शकतात. प्रत्येक मर्यादा ३० सेकंदांची असेल.

मुख्य पंचाच्या परवानगीने सामन्यामध्ये या कालावधीत पाच खेळाडू बदलता येतील. बदली खेळाडू घेतल्याने बाहेर गेलेला खेळाडू पुन्हा बदली खेळाडू म्हणून खेळू शकतो.
खेळ सुरू असताना खेळाडू जखमी झाल्यास संघनायक मुख्य पंचाकडे मागणी करू शकतो. हा दोन मिनिटांपेक्षा अधिक असणार नाही.

मुख्य पंचाच्या परवानगीशिवाय खेळाडू आपले अंगण सोडून बाहेर जाणार नाहीत. याचे उल्लंघन झाल्यास प्रतिस्पर्धी संघास एक विशेष गुण दिला जातो.

लागलेला वेळ उरलेल्या वेळात समाविष्ट करण्यात येईल.

८) निलंबित किंवा बडतर्फ खेळाडूच्या जागी बदली खेळाडू घेता येणार नाही.

९) पाऊस‚ प्रेक्षकांचा व्यत्यय‚ वीजपुरवठा बंद पडणे किंवा मुख्य पंचाला योग्य वाटेल अशा अपरिहार्य कारणामुळे सामना तात्पुरता तहकूब करता येईल. तात्पुरता तहकुबी काळ वीस मिनिटांपेक्षा जास्त नसेल. तात्पुरत्या तहकुबीनंतर सामना वेळेत सुरू झाला‚ तर तो उरलेल्या वेळेपुरताच खेळवावा. या तात्पुरत्या तहकुबीच्या काळात पंचांच्या परवानगीशिवाय मैदान सोडणाऱ्या संघाविरुद्ध एक विशेष गुण दिला जाईल.

१०) तात्पुरत्या तहकुबीपेक्षा अधिक वेळ होऊनही खेळ पुन्हा सुरू होऊ शकला नाही‚ तर तो सामना पुन्हा पूर्ण वेळ खेळवावा. सामना पुन्हा पूर्ण वेळ खेळविल्यास त्यात पूर्वीचेच खेळाडू पाहिजेत‚ असे नाही.

११) पूर्ण वेळेनंतर सामना संपल्यावर ज्या संघाची गुणसंख्या अधिक असेल‚ तो संघ विजयी म्हणून जाहीर केला जाईल.

१२) बाद पद्धतीने (Knock-out) खेळल्या जाणाऱ्या स्पर्धेत सामना पूर्ण वेळ होऊनही समान गुणावर संपला‚ तर दोन्ही संघांना आळीपाळीने प्रत्येकी पाच चढाया करावयास मुख्य पंच सांगतील. या वेळी दोन्ही संघांचे प्रत्येकी पाच खेळाडू आपापल्या अंगणात असतील. संघनायकाने किंवा मार्गदर्शकाने आपल्या पाच खेळाडूंचा चढाई करण्याचा क्रम‚ त्यांची नावे आणि क्रमांक मुख्य पंचाकडे द्यावयाचे आहेत. दिलेल्या क्रमानेच खेळाडू चढाई करतील. ज्या संघाने सामना सुरू होताना प्रथम चढाई केली होती‚ त्या संघास या वेळीही पहिली चढाई करण्याची संधी दिली जाईल.

चढाई करण्यासाठी निर्धारित केलेल्या खेळाडूंपैकी एखादा खेळाडू त्याची चढाईची पाळी येण्यापूर्वीच जबर जखमी झाला आणि तो चढाई करण्यास असमर्थ असेल‚ तर उर्वरित दोन खेळाडूंपैकी एकाला जखमी खेळाडूच्या क्रमांकावर चढाई करण्याची संधी दिली जाते.

या वेळी निदान रेषा ही बोनस रेषा गृहीत धरून बोनस रेषेच्या नियमाप्रमाणे खेळ होईल. (Baulk Line Cum Bonus Line) चढाई करणाऱ्याने निदान रेषा ओलांडली‚ तर एक गुण दिला जाईल. निदान रेषा ओलांडून चढाई करून प्रतिपक्षाच्या एक किंवा अनेक खेळाडूंना स्पर्श करून किंवा झटापट करून तो आपल्या अंगणात सुरक्षित आला‚ तर एका बोनस गुणाबरोबरच बाद केलेल्या खेळाडूबद्दलही गुण मिळतील.

खेळ‘अमर’ पद्धतीने चालेल. बाद झालेल्या खेळाडूबद्दल गुण मिळतील‚ परंतु बाद झालेले खेळाडू बाहेर बसणार नाहीत.

या वेळी बदली खेळाडू घेता येणार नाही.

१३) वरील नियम क्रमांक बारानुसार पेच सुटला नाही‚ तर ‘गोल्डन रेड’ (Golden Raid) पद्धतीचा अवलंब करून पेच सोडविला जाईल. नाणेफेक करून नाणेफेक जिंकणाऱ्या संघास प्रथम चढाई करण्याची संधी मिळेल. त्यामध्ये जो संघ चढाई अगर बचाव करताना गुण मिळवील‚ तो संघ विजयी म्हणून घोषित केला जाईल. पहिल्या सुवर्णचढाईत दोन्ही संघांना समान गुण मिळाले‚ तर दुसऱ्या संघाला त्याची सुवर्णचढाई करण्याची संधी मिळेल. दुसरी चढाई संपल्यानंतर दोन्ही चढायांतील दोन्ही संघाचे एकूण गुण विचारात घेतले जातील. ज्या संघाचे अधिक गुण असतील तो संघ विजयी घोषित केला जाईल.

१४) साखळी पद्धतीने सामने खेळले जात असतील‚ तर विजयी संघास दोन गुण आणि पराभूत संघास शून्य गुण मिळतात. समान गुणांवर सामना संपला‚ तर प्रत्येकास एक-एक गुण दिला जातो. साखळी पद्धतीच्या सामन्यात एक किंवा अनेक विभागांतील संघांचे समान साखळी गुण झाल्यास त्या विभागातील संघात त्या संघाने मिळविलेले गुण व गमावलेले गुण यांची सरासरी काढून विजयी आणि उपविजयी संघ ठरवावा.

१५) संघनायकाशिवाय अन्य खेळाडूने आपल्या अंगणात आपल्या खेळाडूंना सूचना द्यावयाच्या नाहीत.

१६) अर्धी चड्डी (आत लंगोट किंवा जांगिया असावा)‚ गंजीफ्रॉक असा खेळाडूचा पोशाख असावा. सपाट तळाचे कॅनव्हास शूज आणि पायमोजे वापरावयास हरकत नाही.
१७) अमली पदार्थांचे सेवन करणाऱ्या‚ शरीरावर निसरडी वस्तू चोपडणाऱ्या किंवा इतरांना दुखापत होईल अशी वस्तू शरीरावर धारण करणाऱ्या खेळाडूस सामन्यात भाग घेता येणार नाही.


कबड्डी सामना अधिकारी

१) सामन्यासाठी एक मुख्य पंच‚ दोन पंच‚ एक गुणलेखक आणि दोन सहायक गुणलेखक असे अधिकारी असतील.

२) सामान्यपणे पंचाचा निर्णय अंतिम मानला जाईल; परंतु दोन पंचांमध्ये मतभेद असेल‚ तर मुख्य पंच आपला निर्णय देतील. तसेच विशिष्ट परिस्थितीत खेळाच्या हिताच्या दृष्टीने हस्तक्षेप करून मुख्य पंच निर्णय देतील.

३) खालील अखिलाडू वृत्तीच्या कृतीबद्दल खेळाडूस ताकीद देणे‚ प्रतिपक्षास गुण देणे‚ खेळाडू तात्पुरता निलंबित करणे‚ त्या सामन्यापुरता किंवा स्पर्धेपुरता खेळाडू किंवा संघ बाद करणे‚ हे अधिकार पंच आणि मुख्य पंच यांना आहेत.

 1. असभ्य वर्तन करणे.
 2. अधिकाऱ्याबद्दल असभ्य व अनुदार उद्गार काढणे.
 3. प्रतिस्पर्धी खेळाडूबद्दल वैयक्तिक असभ्य व अपमानास्पद उद्गार काढणे.
 4. निष्पक्षपाती निर्णयास बाधा येईल‚ असे वर्तन करणे.
 5. बोट दाखवून पंचाकडून निर्णयाची मागणी करणे.
 6. निकालाबाबत सामना अधिकाऱ्यांना वारंवार विचारणे.

वरीलप्रमाणे खेळाडूकडून वर्तन घडले तर पंच / मुख्य पंच कार्ड दाखवतील.

 • हिरवे कार्ड – ताकीद.
 • पिवळे कार्ड – दोन मिनिटांपुरते तात्पुरते निलंबन.
 • लाल कार्ड – सामन्यापुरते / स्पर्धेपुरते निलंबन / बडतर्फी.

४) पुढीलप्रमाणे नियमोल्लंघन घडले तर ताकीद देणे‚ गुण देणे‚ खेळाडूस किंवा संघास बाद करण्याचा पंच / मुख्य पंच यांना अधिकार आहे.

 1. चढाई करणाऱ्याचे तोंड किंवा गळा दाबून त्याचा दम तोडणे.
 2. शरीरास अपाय होईल‚ असे अयोग्य उपाय करणे.
 3. चढाई करणाऱ्यास पायकैचीने पकडणे.
 4. चढाई करण्यास पाच सेकंदांपेक्षा अधिक वेळ घेणे.
 5. प्रशिक्षक किंवा खेळाडू यांनी आपल्या खेळाडूंना क्रीडांगणाबाहेरून सूचना देणे.

कबड्डी मुख्य पंचाची कर्तव्ये

 1. नाणेफेक करणे.
 2. वेळेची नोंद ठेवून‚ शिट्टी वाजवून सामना सुरू करणे व बंद करणे.
 3. बदली खेळाडू जाहीर करणे.
 4. मध्यंतरानंतर व सामना संपल्यावर दोन्ही संघांचे गुण जाहीर करणे.
 5. विजयी संघ जाहीर करणे.
 6. दुसऱ्या डावात शेवटची पाच मिनिटे‚ प्रत्येक मिनिट संपताच जाहीर करणे.
 7. खेळाडूचा पेहराव व त्याने अमली पदार्थाचे सेवन केलेले नाही याची खात्री करून घेणे.
 8. मुख्य पंचाच्या घड्याळातील वेळ अधिकृत मानली जात असल्याने सामना सुरू होण्यापूर्वी टेबल घड्याळाशी आपले घड्याळ एककालिक   करणे.
 9. संपूर्ण सामन्यावर देखरेख ठेवणे.

कबड्डी पंचांची कर्तव्ये

 1. सामन्यावर देखरेख ठेवून नियमाप्रमाणे निर्णय देणे.
 2. बोनस गुण जाहीर करणे.

कबड्डी गुणलेखकाची कर्तव्ये

 1. गुणपत्रक भरणे‚ गुणपत्रकात खेळाडूंची नावे‚ नाणेफेक जिंकणारा संघ‚ सामना सुरू झाल्याची आणि संपल्याची वेळ इ. बाबींची नोंद करणे.
 2. निलंबित / बडतर्फ खेळाडूची नोंद करणे.
 3. मुख्य पंचाच्या परवानगीने प्रत्येक सत्राच्या शेवटी गुण व निकाल जाहीर करणे.
 4. त्रुटित काळाची नोंद करणे.
 5. बदली खेळाडूंची नोंद करणे.
 6. गुण नोंदवताना पुढील पद्धतीचा अवलंब करणे –
  1. खेळाडूने मिळविलेले गुण ।
  2. लोणचे गुण —
  3. बोनस गुण D
  4. जाहीर झालेले विशेष गुण o
  5. त्रुटित काळ T
 7. गुणपत्रकावर पंच आणि मुख्य पंच यांच्या स्वाक्षऱ्या घेणे.

कबड्डी सहायक गुणलेखकाची कर्तव्ये

 1. पंचांना मदत करणे
 2. खेळाडू ज्या क्रमाने बाद झाले असतील‚ त्या क्रमाची नोंद ठेवणे.
 3. बाद झालेले खेळाडू योग्य ठिकाणी बसतात किंवा नाही ते पाहणे.
 4. जिवंत झालेल्या खेळाडूंची नोंद ठेवणे.
 5. खेळाडूचा अंतिम रेषेच्या बाहेर स्पर्श झाल्यास ते पंचांच्या / मुख्य पंचाच्या निदर्शनास आणून देणे.

टीप :

१) कुमार व किशोर गटांसाठी वयोमर्यादेची अट आलेली आहे‚ म्हणून या गटांतील खेळाडूंचे जन्मतारखेचे दाखले (मुख्याध्यापक/ प्राचार्य यांची स्वाक्षरी असलेले) सादर करणे आवश्यक आहे.

२) आंतरराष्ट्रीय कबड्डी सामने गादीवर खेळविले जातात. अशा सामन्यात खेळणाऱ्या खेळाडूंनी कॅनव्हास शूज वापरणे आवश्यक आहे.

कबड्डी काही नवीन नियम

१) चढाई करणाऱ्या खेळाडूची यशस्वी पकड झाली नाही किंवा अन्य नियमभंगामुळे तो बाद झाला नाही तर चढाई करणाऱ्याने तीस सेकंदांत सुरक्षितपणे परत आले पाहिजे. तीस सेकंदांपेक्षा अधिक वेळ तो प्रतिस्पर्ध्याच्या अंगणात राहिला तर त्याला बाद घोषित केले जाते.

२) संरक्षक संघाच्या अंगणात तीनपेक्षा कमी खेळाडू असतील आणि त्यांनी चढाई करणाऱ्याची यशस्वी पकड केली तर संरक्षक संघास एका गुणाबरोबरच एक अतिरिक्त गुण मिळेल. (एकूण दोन गुण)

३) सामन्यामध्ये (Match) दोन्ही संघांना प्रत्येकी दोन वेळा पंचांच्या निर्णयांविरुद्ध अपील करता येईल.

पुढे वाचा: 

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *