फुटबॉल खेळाची मराठी माहिती

फुटबॉल खेळाची मराठी माहिती – Football Information in Marathi

फुटबॉल क्रीडांगण

लांबी – किमान ९० मी. (१०० यार्ड)
कमाल १२ मी. (१३० यार्ड)
रुंदी –किमान ४५ मी. (५० यार्ड)
कमाल ९० मी. (१०० यार्ड)

(फुटबॉल क्रीडांगणाची लांबी १३० यार्डांपेक्षा अधिक नसावी आणि १०० यार्डांपेक्षा कमी नसावी. क्रीडांगणाची रुंदी १०० यार्डांपेक्षा अधिक नसावी आणि ५० यार्डांपेक्षा कमी नसावी. क्रीडांगणाची लांबी ही रुंदीपेक्षा अधिक असावी. क्रीडांगणाच्या आतील क्षेत्राच्या मापात फरक असणार नाही.) मैदानाच्या सर्व रेषांची जाडी ५ इंचापेक्षा (१२ सें.मी.) अधिक असणार नाही. मैदानाची कोणतीही रेषा तुटक-तुटक नसते.

फुटबॉल मध्यरेषा

क्रीडांगणाचे दोन समान भाग करणारी व गोलरेषांशी समांतर असणारी रेषा

फुटबॉल गोलरेषा

क्रीडांगणाच्या रुंदीच्या बाजूच्या अंतिम रेषा.

फुटबॉल स्पर्शरेषा

क्रीडांगणाच्या लांबीच्या बाजूच्या अंतिम रेषा.

फुटबॉल मध्य वर्तुळ

मध्यरेषेवर मध्यभागी असलेले १० यार्ड (९.१५ मी.) त्रिज्येचे वर्तुळ.

फुटबॉल क्रीडांगण

गोल

प्रत्येक गोलरेषेवर मध्यभागी गोल असतो. दोन उभे खांब व त्यावर एक आडवा खांब (Cross bar) मिळून गोल तयार होतो. दोन खांबांमधील आतील अंतर ८ यार्ड (७.३२ मी.) असते. आडव्या खांबाच्या खालील बाजूची जमिनीपासून उंची ८ फूट (२.४४ मी.) असते. गोल खांब आणि आडवा खांब यांची रुंदी व जाडी ५ इंचांपेक्षा (०.१२ मी.) अधिक असणार नाही. गोल खांब व आडवा खांब लाकडी अगर धातूचे असावेत. त्यांचा आकार गोल असावा. त्यांना पांढरा रंग दिलेला असावा. गोलाच्या मागे जाळे बांधलेले असते.

गोलक्षेत्र (Goal Area)

गोलरेषेवर गोल खांबाच्या आतील बाजूपासून बाहेरील बाजूस ६ यार्ड (५.५० मी.) अंतरावरून गोलरेषेला लंबरूपाने क्रीडांगणात ६ यार्ड लांबीच्या रेषा काढाव्यात. त्या दोन रेषांची टोके जोडल्याने जो आयत तयार होतो‚ त्याला गोलक्षेत्र म्हणतात.

पेनल्टी क्षेत्र (Penalty Area)

गोलरेषेवर गोलखांबाच्या आतील बाजूपासून बाहेरील बाजूस १८ यार्ड (१६.५० मी.) अंतरावरून गोलरेषेला लंबरूपाने क्रीडांगणात १८ यार्ड लांबीच्या रेषा काढाव्यात. त्या दोन रेषांची टोके जोडल्याने जो आयत तयार होतो‚ त्याला पेनल्टी क्षेत्र म्हणतात.

पेनल्टी किक मार्क (Penalty Kick Mark)

गोलाच्या मध्यापासून क्रीडांगणात १२ यार्ड (११.० मी.) अंतरावर (गोलरेषेशी लंबांतर) एक खूण केलेली असते‚ तिला पेनल्टी किक मार्क म्हणतात.

पेनल्टी आर्क (Penalty Arc)

पेनल्टी किक मार्क हा मध्यबिंदू मानून १० यार्ड (९.१५ मी.) त्रिज्येने पेनल्टी क्षेत्राच्या बाहेर जो कंस काढलेला असतो‚ त्याला पेनल्टी आर्क म्हणतात. (पेनल्टी आर्क हा पेनल्टी क्षेत्राचा भाग असत नाही.)

कॉर्नर क्षेत्र (Corner Area)

क्रीडांगणाच्या चारही कोपऱ्यांवर कोपऱ्यातून क्रीडांगणात एक यार्ड त्रिज्येने काढलेल्या कंसाने निश्चित केलेले क्षेत्र.

निशाणे

क्रीडांगणाच्या चारही कोपऱ्यांवर किमान ५ फूट उंचीची निशाणे असतात. तसेच मध्यरेषेवर स्पर्शरेषेच्या बाहेर एक यार्ड अंतरावर किमान ५ फूट उंचीची निशाणे असतात. निशाणाच्या काठीचा वरचा भाग टोकदार नसावा.

टीप –

१) गोलरेषा व स्पर्शरेषा यांचा क्रीडांगणातच समावेश होतो.

२) गोलरेषा व गोलखांब यांची जाडी समान असते. गोलरेषेची जाडी ५ इंचांपेक्षा अधिक नसावी.

३) गोलक्षेत्र व पेनल्टी क्षेत्र आखताना गोलखांबापासून गोलरेषेवर घेतलेले अंतर हे गोलखांबाच्या आतील बाजूपासून घेतलेले असते.

४) क्रीडांगणातील क्षेत्रे मर्यादित करणाऱ्या रेषा त्या क्षेत्रातच समाविष्ट असतात.

फुटबॉल साहित्य

चेंडू – चेंडूचा आकार गोल असतो. चेंडूचे बाह्यावरण (Cover) कातडी किंवा सिंथेटिक मटेरियलचे असते. चेंडूचा परीघ २७ इंचांपेक्षा कमी नसावा आणि २८ इंचांपेक्षा अधिक नसावा. खेळाच्या सुरुवातीस चेंडूचे वजन ४५० ग्रॅमपेक्षा अधिक नसावे व ४१० ग्रॅमपेक्षा कमी नसावे. (सरपंचाच्या पूर्वपरवानगीशिवाय चेंडू बदलता येणार नाही.)

फुटबॉल खेळाडू

१) दोन संघांमध्ये सामना खेळला जाईल. प्रत्येक संघातर्फे कमाल ११ खेळाडू सामन्यामध्ये खेळतील. त्यांपैकी एक गोलरक्षक असेल.

२) सामन्यामध्ये प्रत्येक संघाला पंचाच्या परवानगीने अधिकृत यादीतील तीन बदली खेळाडू घेता येतील. (त्यापैकी एक गोलकीपरसाठी बदली खेळाडू असेल.)

३) बदली खेळाडू देऊन बाहेर गेलेल्या खेळाडूला पुन्हा सामन्यात खेळता येणार नाही. पंचाने शासन करून बाहेर काढलेल्या खेळाडूच्या जागी बदली खेळाडू घेता येणार नाही.

४) गोलरक्षकाच्या जागी दुसरा खेळाडू गोलरक्षक म्हणून खेळू शकतो. मात्र‚ अशा बदलाची पूर्वकल्पना सरपंचाला दिली पाहिजे.

५)   बदली खेळाडूने मैदानात प्रवेश करण्यापूर्वी सरपंचांची परवानगी घेतली पाहिजे.

फुटबॉल खेळाची वेळ

१) प्रत्येकी ४५ मिनिटांच्या दोन सत्रांमध्ये सामना खेळला जाईल. पहिल्या ४५ मिनिटांच्या खेळानंतर १५ मिनिटांची विश्रांती राहील. (खेळाची वेळ काही मिनिटांनी कमी करता येईल; परंतु दोन्ही अर्धातील वेळ सारखीच राहील. वेळ कमी करण्याबाबत सरपंच व दोन्ही संघ यांची सामना सुरू होण्यापूर्वी सहमती झाली असली पाहिजे.)

२) गंभीर स्वरूपाचा अपघात झाल्याने किंवा अन्य कारणाने सामना थांबल्यामुळे वाया गेलेला वेळ सामन्याच्या वेळेव्यतिरिक्त असेल.

३) पेनल्टी किक जाहीर झाल्यावर पहिल्या डावाची किंवा सामन्याची वेळ संपली‚ तरी पेनल्टी किक संपल्यावरच खेळ थांबेल.

४) अपरिहार्य कारणाने अपुरा राहिलेला सामना पुढे खेळविताना पुन्हा पूर्ण सामना खेळवावा लागेल.

फुटबॉल खेळाची सुरुवात

१) नाणेफेक जिंकणारा संघ मैदानाच्या बाजूची निवड करील. प्रतिस्पर्धी संघ किक-ऑफ मारील.

२) किक-ऑफसाठी चेंडू क्रीडांगणाच्या मध्यभागी ठेवला जाईल. चेंडू स्थिर असेल. किक-ऑफ मारणाऱ्या संघाचे सर्व खेळाडू आपल्या अंगणात असतील. प्रतिस्पर्धी संघाचे सर्व खेळाडू आपल्या अंगणात चेंडूपासून किमान १० यार्ड (९.१५ मी.) अंतरावर असतील.

३) पंचाचा इशारा मिळताच किक-ऑफ मारणारा खेळाडू चेंडू मारील. चेंडू आपल्या जागेवरून पुढे हलल्यावर चेंडू खेळात आला‚ असे समजले जाते. अन्य खेळाडूने चेंडूस स्पर्श केल्याशिवाय किक-ऑफ मारणाऱ्याला पुन्हा चेंडूस स्पर्श करता येणार नाही. किक-ऑफ मारणाऱ्याने असा नियमभंग केल्यास प्रतिपक्षास त्या ठिकाणावरून इन्डायरेक्ट फ्री किक मिळते. किक-ऑफ आपल्याच अंगणात मारल्यास पुन्हा किक-ऑफ मारावयास सांगतात.

४) खेळाच्या सुरुवातीस ज्या संघाने किक-ऑफ मारली नव्हती‚ त्या संघाने मध्यंतरानंतर खेळ सुरू होताना किक-ऑफ मारावी. गोल झाल्यावर ज्या संघावर गोल झाला‚ त्या संघाने क्रीडांगणाच्या मध्यभागी किक-ऑफ मारावी.

५)   किक-ऑफ मारून थेट (डायरेक्ट) गोल करता येतो.

शिक्षा – किक-ऑफ मारताना नियमभंग झाला‚ तर पुन्हा किक-ऑफ मारावी. किक-ऑफ नंतर इतर खेळाडूंचा चेंडूस स्पर्श होण्यापूर्वी किक-ऑफ मारणाऱ्याने चेंडूस स्पर्श केला‚ तर प्रतिस्पर्धी संघाला इन्डायरेक्ट किक मारावयास सांगावे.

(अन्य कारणाने खेळ तात्पुरता थांबला असेल‚ तर खेळ पुन्हा सुरू करताना खेळ थांबलेल्या ठिकाणी सरपंच चेंडू वरून खाली सोडील. जमिनीला चेंडूचा स्पर्श होताच चेंडू खेळात येईल आणि खेळाडूंना तो खेळता येईल. जमिनीला स्पर्श होण्यापूर्वी एखाद्या खेळाडूचा चेंडूस स्पर्श झाला‚ तर त्याला ताकीद द्यावी व पुन्हा चेंडू जमिनीवर सोडून खेळ सुरू करावा.)

खेळात असलेला चेंडू

गोलरेषा किंवा स्पर्शरेषा यांच्यावरून चेंडू पूर्णपणे क्रीडांगणाबाहेर जातो किंवा सरपंच काही कारणांनी खेळ थांबवितात‚ त्या वेळी चेंडू खेळात नसतो. वरील अपवाद वगळता सामन्याच्या सुरुवातीपासून शेवटपर्यंत चेंडू खेळात असतो. गोल खांब‚ आडवा खांब किंवा कोपऱ्यातील निशाणे यांना लागून क्रीडांगणात आलेला चेंडू खेळात असतो. क्रीडांगणात असणारे सरपंच किंवा सहायक पंच यांना चेंडू लागला तरी चेंडू खेळात असतो. नियमभंगाबद्दल सरपंच निर्णय देईपर्यंत चेंडू खेळात असतो. (हवेत असलेल्या चेंडूने स्पर्शरेषा पूर्णपणे ओलांडली असेल आणि नंतर तो चेंडू स्पर्शरेषेवर किंवा क्रीडांगणात पडला‚ तरी तो खेळात नसलेला चेंडू मानला जातो.)

क्रीडांगणात किंवा क्रीडांगणाच्या रेषेवर असणारा चेंडू खेळताना खेळाडू रेषेच्या बाहेर असला तरी चालते. गोलरक्षक गोलरेषेच्या / पेनल्टी क्षेत्राच्या आत असेल‚ परंतु त्याच्या हातातील चेंडू गोलरेषेच्या / पेनल्टी क्षेत्राच्या पूर्णपणे बाहेर असेल; तर तो चेंडू गोलरेषेबाहेर / पेनल्टी क्षेत्राबाहेर गेला‚ असे समजतात. गोलरक्षकाचे पाय पेनल्टी क्षेत्राच्या बाहेर असतील व हातातील चेंडू पेनल्टी क्षेत्रात असेल‚ तर तो चेंडू पेनल्टी क्षेत्रातच आहे.

फ्री किक (Free-Kick)

फ्री किकचे डायरेक्ट किक (Direct Kick) आणि इन्डायरेक्ट किक (Indirect Kick) असे दोन प्रकार आहेत. जी किक मारून प्रतिपक्षावर डायरेक्ट गोल करता येतो‚ तिला डायरेक्ट किक म्हणतात. जी फ्री किक मारल्यावर दुसऱ्या खेळाडूचा चेंडूला स्पर्श झाल्याशिवाय गोल होत नाही‚ तिला इन्डायरेक्ट किक म्हणतात.

फ्री किक मारताना चेंडू स्थिर पाहिजे. फ्री किक मारल्यावर इतर खेळाडूंनी चेंडूस स्पर्श केल्याशिवाय फ्री किक मारणाऱ्याला चेंडूस स्पर्श करता येणार नाही. त्याच्याकडून तसा नियमभंग घडला‚ तर प्रतिपक्षाला इन्डायरेक्ट फ्री किक मिळते. तसेच पुढील प्रसंगी प्रतिपक्षाला इन्डायरेक्ट फ्री किक मिळते.

 1. चेंडू धोकादायक पद्धतीने खेळणे.
 2. प्रतिस्पर्ध्याच्या प्रगतीत अडथळा आणणे.
 3. गोलरक्षकाला चेंडू हातातून सोडण्यास अडथळा आणणे.
 4. गोलरक्षकाने ५/६ सेकंदांपेक्षा जास्त वेळ चेंडू हातात ठेवणे.
 5. आपल्याच संघाच्या खेळाडूने थ्रो-इन केलेला चेंडू इतर खेळाडूचा स्पर्श न होता गोलरक्षकाने हाताळणे.
 6. गोलरक्षकाने हातात चेंडू असताना किंवा चेंडू आपटत (Bouncing) किंवा चेंडू हवेत उडवून परत पकडून चारपेक्षा अधिक पावले टाकणे व इतर खेळाडूंकडे चेंडू खेळण्यासाठी न देणे.

पुढील प्रसंगी दोषी खेळाडूच्या प्रतिस्पर्ध्यास डायरेक्ट फ्री किक मिळते

 1. प्रतिस्पर्ध्यास लाथ मारणे किंवा लाथ मारण्याचा प्रयत्न करणे.
 2. प्रतिस्पर्ध्याच्या पायात पाय अडकवून प्रतिस्पर्ध्यास पाडण्याचा प्रयत्न करणे किंवा पाडणे.
 3. प्रतिस्पर्ध्याच्या अंगावर उडी मारणे.
 4. प्रतिस्पर्ध्याच्या अंगावर धावून जाणे. (Charging)
 5. प्रतिस्पर्ध्याला मारणे किंवा मारण्याचा प्रयत्न करणे.
 6. प्रतिस्पर्ध्यास ढकलून देणे.
 7. चेंडू ताब्यात घेण्यासाठी चेंडूला स्पर्श होण्याअगोदर प्रतिस्पर्ध्यास मागून टॅकल (tackle) करणे.
 8. प्रतिस्पर्ध्यास धरून ठेवणे.
 9. प्रतिस्पर्ध्याच्या अंगावर थुंकणे. १०. चेंडू हेतुपूर्वक हाताळणे.

डायरेक्ट फ्री किक घेतली जाते त्या वेळी प्रतिस्पर्धी संघाचे खेळाडू चेंडूपासून किमान १० यार्ड अंतरावर असले पाहिजेत.

डायरेक्ट फ्री किक मारून प्रतिपक्षावर गोल करता येतो. खेळाडूने आपल्याच गोलात डायरेक्ट फ्री किक मारली तर प्रतिपक्षास कॉर्नर किक मारण्याची संधी मिळते. इन्डायरेक्ट फ्री किक मारलेला चेंडू अन्य खेळाडूला स्पर्श न होता प्रतिस्पर्ध्याच्या गोलात गेला तर गोल किक मिळते.

जर इन्डायरेक्ट फ्री किक मारलेला चेंडू कोणासही स्पर्श न होता आपल्याच गोलात गेला‚ तर प्रतिपक्षास कॉर्नर किक मिळते. संरक्षक संघास त्याच्याच पेनल्टी क्षेत्रात डायरेक्ट किंवा इन्डायरेक्ट फ्री किक मिळाली असेल तर प्रतिस्पर्धी संघाचे खेळाडू पेनल्टी क्षेत्राच्या बाहेर चेंडूपासून किमान ९.१५ मी (१० यार्ड) दूर असतील. फ्री किक मारलेला चेंडू पेनल्टी क्षेत्राच्या बाहेर गेला नाही तर पुन्हा फ्री किक घेण्यास सांगितले जाते. संरक्षक संघास गोल क्षेत्रात फ्री किक मिळाली तर गोलक्षेत्राच्या कोणत्याही भागातून फ्री किक मारली जाते.

आक्रमक संघाला पेनल्टी क्षेत्राच्या बाहेर फ्री किक मिळाली असेल तर संरक्षक खेळाडू स्थिर चेंडूपासून ९.१५ मी. (१० यार्ड) दूर असतील. फ्री किक मारण्यापूर्वी ते पुढे आले तर फ्री किक पुन्हा घेतली जाईल. आक्रमक संघाला प्रतिस्पर्ध्याच्या गोलक्षेत्रात इन्डायरेक्ट फ्री किक मिळाली असेल तर ती फ्री किक गोल रेषेशी समांतर असणाऱ्या गोलक्षेत्ररेषेवरून घेतली जाते.

थ्रो-इन् (Throw-in)

१) चेंडू पूर्णपणे स्पर्शरेषेच्या बाहेर जातो (either on the ground or in the air) त्या वेळी जेथून तो बाहेर गेला तेथून क्रीडांगणात फेकावयाचा असतो. ज्या संघाच्या खेळाडूचा शेवटी स्पर्श होऊन चेंडू बाहेर गेला असेल‚ त्याच्या प्रतिस्पर्धी संघास थ्रो-इन् करावयास मिळतो.

२) थ्रो-इन् करणाऱ्या खेळाडूचे तोंड मैदानाकडे असेल. त्याचे दोन्ही पाय स्पर्शरेषेवर किंवा स्पर्शरेषेच्या बाहेर असतात. दोन्ही पायांचा जमिनीशी संपर्क पाहिजे. थ्रो-इन् करताना टाचा उचलल्या किंवा पाय जमिनीबरोबर सरपटला (Dragging) तरी चालते. परंतु टाचा उचलल्यामुळे स्पर्शरेषेच्या बाहेरच्या जमिनीशी संपर्क सुटला‚ तर तो नियमभंग आहे. चेंडू डोक्यामागून डोक्यावरून पुढे आणून दोन्ही हातांनी फेकावयाचा असतो. चेंडू फेकावयाचा (Throw) असतो‚ खाली आपटायचा (Drop) नसतो. स्पर्शरेषेपासून एक मीटरपेक्षा जास्त अंतरावरून थ्रो-इन् करता येणार नाही.

३) थ्रो-इन् करणाऱ्याचा नियमभंग झाला‚ तर प्रतिपक्षास थ्रो-इन् करावयास संधी मिळते.

४) थ्रो-इन् केल्यानंतर अन्य खेळाडूचा चेंडूला स्पर्श होण्यापूर्वी थ्रो-इन् करणाऱ्याने चेंडूला स्पर्श केला किंवा आपल्या संघाच्या खेळाडूने थ्रो-इन् केलेला परंतु इतर खेळाडूचा स्पर्श न झालेला चेंडू गोलरक्षकाने हाताळला‚ तर प्रतिस्पर्धी संघास इन्डायरेक्ट किक मिळते. पेनल्टी एरियाच्या बाहेर ही चूक घडली‚ तर प्रतिपक्षास फ्री किक मिळते.

५) थ्रो-इन् केल्यावर अन्य खेळाडूचा स्पर्श होण्यापूर्वी थ्रो-इन करणाऱ्याने हेतुपूर्वक चेंडू हाताळला‚ तर प्रतिपक्षास डायरेक्ट फ्री किक मिळते. अशी चूक थ्रो-इन करणाऱ्याच्या पेनल्टी एरियात घडली‚ तर प्रतिपक्षास पेनल्टी किक मिळते.

६) थ्रो-इन् करून डायरेक्ट गोल करता येणार नाही.

गोल किक (Goal Kick)

आक्रमक खेळाडूने (Attacker) मारलेला चेंडू गोलखांबाच्या बाहेरून किंवा आडव्या खांबाच्या वरून पूर्णपणे गोलरेषेच्या बाहेर गेला‚ तर संरक्षक संघास गोल किक मिळते. गोलाच्या ज्या बाजूने चेंडू बाहेर गेला असेल‚ त्या बाजूने गोल क्षेत्रातून गोल किक मारायची असते.

गोल किक मारताना प्रतिपक्षाचे खेळाडू पेनल्टी क्षेत्राच्या बाहेर असतील. गोल किक मारून चेंडू पेनल्टी क्षेत्राच्या बाहेर आला नाही‚ तर पुन्हा गोल किक मारावयास सांगावे. किक मारणाऱ्याशिवाय अन्य कोणत्याही खेळाडूने पेनल्टी क्षेत्रात त्या चेंडूला स्पर्श केला‚ तर पुन्हा गोल किक मारावयास सांगावी.

गोल किक मारल्यानंतर इतर खेळाडूंनी चेंडूला स्पर्श केल्याशिवाय किक मारणाऱ्यानेच चेंडूला स्पर्श केला‚ तर तो नियमभंग मानून नियमभंग घडलेल्या ठिकाणी प्रतिपक्षास इन्डायरेक्ट किक द्यावी. गोल किक मारणाऱ्याने इतर खेळाडूंचा स्पर्श होण्यापूर्वी हेतुपूर्वक चेंडू हाताळला‚ तर प्रतिपक्षास इन्डायरेक्ट किक मिळते.

संरक्षक खेळाडूने पेनल्टी क्षेत्रात चेंडू हाताळला किंवा अन्य नियमभंग केला तर प्रतिपक्षास पेनल्टी किक मिळते. गोलरक्षक किंवा संरक्षक संघाचा कोणताही खेळाडू गोल किक मारू शकतो. गोल किक मारून प्रतिस्पर्धी संघावर डायरेक्ट गोल करता येतो.

कॉर्नर किक (Corner Kick)

संरक्षक खेळाडूने मारलेला किंवा संरक्षक संघाच्या खेळाडूस शेवटी स्पर्श होऊन चेंडू गोलखांबाच्या बाहेरून किंवा आडव्या खांबाच्या वरून पूर्णपणे गोलरेषेबाहेर गेला‚ तर आक्रमक संघास कॉर्नर किक मिळते. इन्डायरेक्ट फ्री किक मिळालेल्या संघाच्या खेळाडूने चेंडू थेट (डायरेक्ट) आपल्याच गोलात मारला तर आक्रमक संघास कॉर्नर किक मारण्याची संधी मिळते.

गोलाच्या ज्या बाजूने चेंडू बाहेर गेला असेल‚ त्या बाजूच्या कोपऱ्यावर आखलेल्या कॉर्नर क्षेत्रातून आक्रमक संघाच्या खेळाडूने कॉर्नर किक मारावयाची असते. चेंडू पूर्णपणे कॉर्नर क्षेत्रात पाहिजे. चेंडू स्थिर पाहिजे. कॉर्नर किक मारताना कोपऱ्यावरील निशाण काढू नये.

कॉर्नर किक मारण्याच्या वेळी प्रतिपक्षाचे खेळाडू चेंडूपासून किमान १० यार्ड अंतरावर दूर असतील.

कॉर्नर किक मारणाऱ्याने किक मारल्यानंतर अन्य खेळाडूचा चेंडूला स्पर्श झाल्याशिवाय पुन्हा चेंडूस स्पर्श करावयाचा नाही. तसे केल्यास त्या ठिकाणी प्रतिपक्षास इन्डायरेक्ट किक मिळते. चेंडू हाताळला‚ तर डायरेक्ट फ्री किक मिळते.

कॉर्नर किक मारून डायरेक्ट गोल करता येतो.

गोलरक्षकाला स्पर्श होऊन चेंडू गोलात गेला‚ तर गोल होतो.

पेनल्टी किक (Penalty Kick)

पेनल्टी किक ही पेनल्टी किक मार्कवरून मारावयाची असते. पेनल्टी किक मारून डायरेक्ट गोल करता येतो. संरक्षक खेळाडूने त्याच्या पेनल्टी क्षेत्रात जाणूनबुजून पुढीलपैकी कोणताही नियमभंग केला‚ तर आक्रमक संघास पेनल्टी किक मिळते :

१) प्रतिस्पर्धी खेळाडूस हाताने ढकलणे.
२) प्रतिस्पर्ध्यावर धोकादायकरीत्या हल्ला करणे किंवा त्याला धक्का मारणे. (Charging) (गोलक्षेत्रात गोलरक्षकाच्या ताब्यात चेंडू असेल किंवा तो आक्रमकांना अडथळा आणत असेल‚ तर गोलरक्षकावर प्रतिहल्ला (Charging) करता येतो.)
३) प्रतिस्पर्धी अडथळा आणीत नसताना त्याला पाठीमागून धक्का मारणे.
४) प्रतिस्पर्ध्यास मारणे किंवा मारण्याचा प्रयत्न करणे.
५) प्रतिस्पर्ध्यास लाथ मारणे.
६) प्रतिस्पर्ध्याच्या पायात पाय अडकवून त्याला पाडणे किंवा पाडण्याचा प्रयत्न करणे.
७) प्रतिस्पर्ध्याला हाताने धरून ठेवणे.
८) हाताने चेंडू मारणे किंवा पुढे ढकलणे. (अपवाद – गोलरक्षक)
९) प्रतिस्पर्ध्यावर उडी मारणे. (Jumping at an opponent)

(वरील नऊ नियमभंग पेनल्टी क्षेत्राच्या बाहेर जाणीवपूर्वक झाले असतील‚ तर तेथून आक्रमक संघास डायरेक्ट किक मिळते.)

पेनल्टी क्षेत्रात गोलरक्षकाने आक्रमक खेळाडूला चेंडू जाणूनबुजून जोरात फेकून मारला किंवा चेंडू हातात असताना आक्रमक खेळाडूला ढकलले‚ तर आक्रमक संघास पेनल्टी किक दिली जाते.

पेनल्टी किक मारताना संरक्षक संघाचा फक्त गोलरक्षक गोलात गोलरेषेवर असतो. त्यांचे इतर सर्व खेळाडू पेनल्टी क्षेत्राच्या बाहेर चेंडूपासून किमान १० यार्ड अंतरावर असतात. पेनल्टी किकच्या वेळी गोलरक्षकाला गोलरेषेवर हालचाल करता येईल.

सरपंचाने पेनल्टी किक मारण्याचा इशारा दिल्यावर गोलरक्षकाचा किंवा संरक्षक संघाच्या अन्य खेळाडूंचा नियमभंग झाला व त्या वेळी गोल झाला असेल‚ तर गोल नोंदविला जातो आणि गोल झाला नसेल‚ तर पुन्हा पेनल्टी किक मारावयास सांगितली जाते. पेनल्टी किक मारली जात असताना किक मारणाऱ्या खेळाडूशिवाय अन्य आक्रमक खेळाडूचा नियमभंग झाला असेल व त्या वेळी गोल झाला असेल‚ तर गोल नाकारला जातो आणि पुन्हा पेनल्टी किक मारावयास सांगितले जाते. गोल झाला नाही‚ तर पुन्हा पेनल्टी किक दिली जात नाही.

पेनल्टी किक मारल्यावर तो चेंडू गोलला किंवा गोलरक्षकाला तटून परत आला‚ तर दुसऱ्या खेळाडूचा त्या चेंडूला स्पर्श झाल्याशिवाय पेनल्टी किक मारणाऱ्याला चेंडू खेळता येणार नाही. गोलरक्षकाला किंवा खांबाला किंवा क्रॉसबारला स्पर्श करून चेंडू गोलात गेला‚ तर गोल होतो.

पेनल्टी किक मारल्यानंतर गोलखांबाला किंवा गोलरक्षकाला तटून आलेल्या चेंडूला अन्य खेळाडूचा स्पर्श होण्यापूर्वी पेनल्टी किक मारणाऱ्याने स्पर्श केला‚ तर प्रतिस्पर्धी संघास त्या ठिकाणाहून इन्डायरेक्ट फ्री किक मिळते.

सरपंचाने पेनल्टी किक जाहीर केल्यानंतर मध्यंतरासाठी सामना थांबण्याची किंवा सामना संपण्याची वेळ झाली तरी पेनल्टी किक मारल्यानंतरच खेळ थांबवावा. चेंडू गोलाला किंवा गोलरक्षकाला तटून परत आला‚ तर खेळ तेथेच थांबेल.

ऑफसाइड (Offside) प्रतिपक्षाच्या अंगणात आक्रमक संघाचा खेळाडू चेंडू खेळतो (मारतो)‚ त्या वेळी त्याच्या संघाचा अन्य खेळाडू प्रतिपक्षाच्या अंगणात चेंडूच्या पुढे असेल आणि त्याच्या व प्रतिपक्षाच्या गोलरेषेच्या मध्ये दोनपेक्षा कमी प्रतिस्पर्धी खेळाडू असतील‚ तर तो पुढे असणारा खेळाडू ऑफसाइड होतो. संरक्षक संघाचा दुसरा खेळाडू आणि आक्रमक संघाचा खेळाडू एकाच रेषेत असतील‚ तर ऑफसाइड देऊ नये.

ऑफसाइड ठरविताना तो खेळाडू चेंडूला कधी स्पर्श करतो याऐवजी त्या खेळाडूकडे त्याच्या संघातील खेळाडूने चेंडू कधी मारला‚ त्या वेळची स्थिती विचारात घेतली जाते. प्रतिस्पर्धी चेंडू मारतो त्या वेळी खेळाडू ऑफसाइड होत नाही. गोल किक‚ कॉर्नर किक‚ थ्रो-इन् किंवा सरपंचाने खेळ सुरू करण्यासाठी चेंडू खाली सोडणे (Common throw) या वेळी खेळाडू ऑफसाइड होत नाही.

ऑफसाइड असणारा खेळाडू खेळात सहभागी नसेल किंवा त्याच्या त्या स्थितीमुळे प्रतिस्पर्धी संघाच्या खेळात व्यत्यय येत नसेल किंवा त्याच्या स्थितीमुळे त्याच्या संघाला फायदा होण्याची शक्यता नसेल‚ तर त्या खेळाडूला ऑफसाइड म्हणून शासन करू नये. स्वत:च्या अंगणात खेळाडू ऑफसाइड होत नाही.

शिक्षा – ज्या ठिकाणी नियमभंग घडला असेल‚ तेथून प्रतिपक्षास इन्डायरेक्ट किक द्यावी.

अयोग्य वर्तनाबद्दल शासन

फुटबॉल हा गतिमान खेळ आहे. चेंडू आपल्या ताब्यात ठेवण्यासाठी किंवा प्रतिस्पर्ध्याच्या ताब्यातील चेंडू काढून घेण्यासाठी खेळाडूंची धडपड सुरू असते. अनेकदा दांडगाईचे किंवा धक्काबुक्कीचे प्रसंगही घडतात. काही प्रसंगी खेळाडूकडून असभ्य वर्तनही घडते. अशा नियमबाह्य व असभ्य वर्तनाची दखल सरपंचाकडून घेतली जाते. नियमबाह्य वर्तन सामान्य असेल‚ तर सरपंच त्या खेळाडूस बोलावून तोंडी ताकीद देतात. संरक्षक संघाच्या खेळाडूने आपल्याच पेनल्टी क्षेत्रात वार्तनिक प्रमाद केला असेल तर आक्रमक संघास पेनल्टी किक मारण्याची संधी दिली जाते. नियमबाह्य वर्तन गंभीर असेल किंवा पूर्वी ताकीद दिलेल्या खेळाडूकडून पुन्हा तसेच वर्तन घडत असेल‚ तर सरपंच खेळाडूला पिवळे किंवा लाल कार्ड दाखवून शिक्षा देतात.

खेळाडूकडून खालील प्रकारचे नियमबाह्य व शिस्तबाह्य वर्तन घडले‚ तर त्याला सरपंचाकडून पिवळे कार्ड दाखविले जाते.

 1. अखिलाडूपणाची वागणूक.
 2. कृतीद्वारे किंवा शब्दाद्वारे सामना अधिकाऱ्याच्या निर्णयास विरोध करणे.
 3. खेळाच्या नियमाचा सातत्याने भंग करणे.
 4. पुन्हा खेळ सुरू करण्यास जाणीवपूर्वक विलंब करणे.
 5. कॉर्नर किक किंवा डायरेक्ट फ्री किक दिली असताना सूचना मिळूनही चेंडूपासून आवश्यक ते अंतर न ठेवता उभे राहणे.
 6. सरपंचाच्या परवानगीशिवाय मैदानाबाहेर जाणे किंवा मैदानावर येणे.
 7. सरपंचाची परवानगी न घेता जाणीवपूर्वक मैदानाच्या बाहेर जाणे. ज्या संघातील खेळाडूला सरपंचाने पिवळे कार्ड दाखविले आहे‚ त्याच्या प्रतिस्पर्धी संघास डायरेक्ट फ्री किक मिळते.

खेळाडूकडून खालील प्रकारचे नियमबाह्य वर्तन घडत असेल‚ तर सरपंच त्याला लाल कार्ड दाखवतील आणि त्या खेळाडूला मैदानाबाहेर जाण्यास सांगतील. त्या खेळाडूस त्या सामन्यात पुढे खेळता येणार नाही किंवा त्याला बाहेर काढल्यानंतर त्याच्या जागी बदली खेळाडू घेता येणार नाही.

 1. चुकीच्या पद्धतीने खेळण्याची गंभीर चूक करणे.
 2. उद्दामपणे‚ उद्धटपणे‚ आक्रमकपणे वागण्याबाबत दोषी असणे.
 3. प्रतिस्पर्धी खेळाडूवर किंवा इतरांवर थुंकणे.
 4. असभ्य व अपमानास्पद शब्दांचा वापर करणे.
 5. त्याच सामन्यामध्ये दुसऱ्यांदा ताकीद मिळून पिवळे कार्ड दाखविले जाणे.

गोल होणे (Scoring)

गोलखांबांच्या मधून व आडव्या खांबाच्या खालून चेंडू पूर्णपणे गोलरेषा ओलांडतो‚ तेव्हा गोल होतो.

आक्रमक संघाच्या खेळाडूने हाताने ढकललेला किंवा हाताने मारलेला किंवा वाहून नेलेला (Carried) चेंडू गोलात गेला‚ तर गोल होत नाही. संरक्षक खेळाडूने हाताने चेंडू ढकलला किंवा मारला आणि तो चेंडू गोलात गेला‚ तर तो गोल होतो.

इन्डायरेक्ट फ्री किक मारल्यानंतर त्या चेंडूला इन्डायरेक्ट किक मारणाऱ्या खेळाडूशिवाय अन्य खेळाडूचा स्पर्श होऊन चेंडू गोलात गेला‚ तर गोल होतो.

गोलरक्षकाशिवाय अन्य संरक्षक खेळाडूने पेनल्टी क्षेत्रात हाताने चेंडू अडवून गोल वाचविला असेल‚ तर आक्रमक संघास पेनल्टी किक मिळते. पेनल्टी क्षेत्राच्या बाहेर हाताने चेंडू अडवून गोल वाचविल्यास आक्रमक संघास तेथून डायरेक्ट किक मिळते.

आपल्याच पेनल्टी क्षेत्राच्या बाहेरून इन्डायरेक्ट किक मारणाऱ्या खेळाडूने मारलेला चेंडू कोणाचाही स्पर्श न होता त्याच्याच गोलात गेला‚ तर आक्रमक संघास कॉर्नर किक मिळते.

डायरेक्ट किक मारून डायरेक्ट गोल करता येतो.

इतर कोणताही नियमभंग नसेल‚ तर सरपंचास स्पर्श होऊन चेंडू गोलात गेला‚ तर त्या गोलाची नोंद होईल.

गोल झाल्यावर ज्या संघावर गोल झाला असेल‚ त्या संघाचा खेळाडू मध्य वर्तुळात चेंडू ठेवून प्लेस किक मारतो आणि खेळ पुढे सुरू राहतो.

फुटबॉल सामन्याचा निकाल

१) सामन्यात अधिक गोल करणारा संघ विजयी होतो.

२) सामन्यात कोणत्याही संघाचा गोल झाला नाही किंवा दोन्ही संघांचे समान गोल झाले‚ तर सामना अनिर्णित राहतो. सामन्याचा निकाल लावावयाचा असेल‚ तर पुढील पद्धतींचा अवलंब करून सामन्याचा निकाल ठरविला जातो.

(अ) पूर्ण वेळ सामना खेळून बरोबरी झाली‚ तर ‘गोल्डन गोल’ पद्धतीने निकाल लावला जातो. बरोबरी झाल्यावर १५ १५ मिनिटे जादा वेळेसाठी सामना खेळला जाईल. या वेळी प्रथम गोल नोंदविणारा संघ विजयी होईल आणि सामना तेथेच संपेल. जादा वेळेतही निकाल लागला नाही‚ तर पेनल्टी किक्स्वर निकाल लावला जाईल.

(ब) प्रत्येक संघाला पाच पेनल्टी किक्स मिळतील. सरपंच गोलाची निवड करतील आणि नाणेफेक करतील. नाणेफेक जिंकणारा संघ पहिली पेनल्टी किक मारील. दोन्ही संघ आलटून-पालटून पेनल्टी किक्स मारतील. एका खेळाडूला एकच किक मारता येईल.

पेनल्टी किक्स मारण्याच्या वेळी दोन्ही संघांचे गोलरक्षक व पेनल्टी किक मारणारा खेळाडू वगळता दोन्ही संघांचे इतर खेळाडू मध्य वर्तुळात असतील. किक मारणाऱ्या संघाचा गोलरक्षक पेनल्टी क्षेत्राच्या बाहेर आणि पेनल्टी किक मार्कपासून १० यार्ड अंतरावर दूर उभा राहील.

प्रत्येक संघाने पाच पेनल्टी किक्स मारूनही सामन्याचा निकाल लागला नाही‚ तर पेनल्टी किक्स मारणे पुढे सुरू ठेवावे. दोन्ही संघांना समान किक्स मिळाल्यानंतर ज्या संघाने एक गोल अधिक केला असेल‚ तो संघ विजयी म्हणून जाहीर करावे. (प्रत्येक संघाने पाच जादा किक्स मारल्या पाहिजेत‚ असे नाही.)

सामन्याचा दुसरा डाव संपताना किंवा जादा वेळेतील खेळ संपताना जे खेळाडू मैदानावर होते‚ त्यांनाच पेनल्टी किक्स मारण्यात भाग घेता येईल. पेनल्टी किक्स अडविताना गोलरक्षक जखमी झाला आणि तो खेळण्यास असमर्थ असेल‚ तर राखीव खेळाडूस त्याची जागा घेता येईल.

फुटबॉल सामना अधिकारी

सामन्यासाठी एक सरपंच (Referee)‚ दोन सहायक सरपंच आणि चौथे अधिकारी असे अधिकारी असतील.

सरपंच – सरपंच सामन्यामध्ये नियमानुसार निर्णय देतील. नियमभंग होत असेल किंवा अयोग्य वर्तन घडत असेल किंवा धोकादायक खेळ होत असेल‚ तर सरपंच संबंधितांना योग्य शासन करतील. दोषी खेळाडूला ताकीद देण्याचा व मैदानाबाहेर काढण्याचा सरपंचाला अधिकार आहे. एखादा संघ बाद करण्याचा सरपंचाला अधिकार नाही.

एखाद्या खेळाडूस जबर दुखापत झाली असेल किंवा जखमी खेळाडूच्या जखमेतून रक्तस्राव होत असेल‚ तर सरपंच खेळ थांबवतील व त्या खेळाडूला मैदानाबाहेर हलविल्यावर ताबडतोब पुढे खेळ सुरू करतील. रक्तस्राव झालेल्या खेळाडूवर योग्य उपचार करून रक्तस्राव थांबला असेल तर सरपंच खात्री करून घेऊन त्याला खेळावयास परवानगी देतील. किरकोळ अपघाताच्या वेळी चेंडू खेळात नसताना खेळ थांबविला जाईल.

सरपंच बदली खेळाडू घेण्यास परवानगी देईल. तसेच सहायक सरपंचांना त्यांच्या कामाची कल्पना देऊन आवश्यक त्या वेळी गोलासंबंधी निर्णय देण्याबाबत सहायक सरपंचाशी चर्चा करू शकतील.

सामन्याच्या वेळेची आणि झालेल्या गोलांची नोंद सरपंच ठेवील.

फुटबॉल सहायक सरपंच (Assistant Referees)

सामन्यामध्ये दोन सहायक सरपंच सरपंचाचे सहायक म्हणून काम करतात. चेंडू क्रीडांगणाच्या बाहेर जाताच सहायक सरपंच आपल्या हातातील योग्य रंगाच्या निशाणाने इशारा करतील. गोलरेषेवरून चेंडू बाहेर गेल्यावर गोल किक किंवा कॉर्नर किक देण्याबाबत ते सरपंचाला मदत करतील. कोणत्या संघाने थ्रो-इन् करावयाचा याचाही ते निर्देश करतील.

दांडगाईच्या खेळाकडे व खेळाडूच्या असभ्य वर्तनाकडे सरपंचाचे लक्ष वेधतील. सरपंचाने विचारलेल्या बाबीबाबत सहायक सरपंच आपले मत सांगतील. खेळाडू ऑफसाइड असेल‚ तर तसा इशारा करतील. पेनल्टी किक मारली जाते त्या वेळी किक मारण्यापूर्वीच गोलरक्षक गोलरेषेच्या पुढे आला असेल तर आणि चेंडूने गोलरेषा पूर्णपणे ओलांडली असेल तर त्याकडे सरपंचाचे लक्ष वेधतील.

चौथे अधिकारी

चौथे अधिकारी मैदानाबाहेर राहून सामन्याचे बारकाईने निरीक्षण करतात. त्यांची कर्तव्ये पुढीलप्रमाणे आहेत.

१) सामना संपेपर्यंत सरपंचांना आवश्यक ती मदत करणे.

२) सामना चालू असताना सरपंचांना सामन्यात काम करणे अशक्य झाले तर त्यांच्या जागी सरपंच म्हणून काम करणे.

३) सामना चालू असताना बदली खेळाडू घेण्याच्या प्रक्रियेस मदत करणे.

४) सामना सुरू होण्यापूर्वी चेंडूची तपासणी करून तो योग्य असल्याची खात्री करणे. खेळातील चेंडू खेळण्यास अयोग्य झाला तर त्याच्याऐवजी दुसरा चेंडू वापरण्यास सरपंचांना परवानगी देणे.

५) सामना संपल्यावर सामना समितीकडे सामन्याविषयी अहवाल सादर करणे (या अहवालामध्ये सरपंच आणि सहायक सरपंच यांच्या नजरेतून सुटलेल्या खेळाडूंच्या गैरवर्तनाबाबतचा उल्लेख जरूर असेल.)

६) सरपंच आणि सहायक सरपंच यांनी सादर करावयाच्या अहवालाबाबत त्यांना मार्गदर्शन करणे व सल्ला देणे.

७) तांत्रिक क्षेत्रात बसलेल्या मार्गदर्शक आणि बदली खेळाडूंच्या बेफिकीर वर्तनाची सरपंचांना माहिती देण्याचा अधिकार आहे.

८) सामन्यातील राखीव सहायक सरपंचाची नेमणूक करणे. (सामना चालू असताना एखादा सहायक सरपंच पुढे काम करण्यास असमर्थ ठरला‚ तर नेमलेला राखीव सहायक सरपंच त्याची जागा घेईल.)

पुढे वाचा: क्रिकेट या खेळाबद्दल संपूर्ण माहिती

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *