क्रिकेट या खेळाबद्दल संपूर्ण माहिती

Table of Contents

क्रिकेट क्रीडांगण व साहित्य

खेळपट्टी (Pitch)

दोन विकेट्समधील (किंवा दोन्ही बोलिंग क्रीजमधील) अंतरास पिच किंवा खेळपट्टी म्हणतात. दोन विकेट्समध्ये २२ यार्ड (२०.१२ मी.) अंतर असते. खेळपट्टीची रुंदी १० फूट (३.०४ मी.) असते.

सामन्यात खेळपट्टी बदलता येणार नाही. क्रिकेट खेळपट्टी खेळास अयोग्य बनली आणि दोन्ही कप्तानांनी संमती दिली‚ तरच खेळपट्टी बदलावी.

विकेट्स (Wickets)

तीन स्टम्प्स (Stumps) व त्यांवरील दोन बेल्स (Bails) मिळून विकेट तयार होते. विकेटची रुंदी ९ इंच (२२.९ सें.मी.) असते. स्टम्प्सची जमिनीपासून उंची २८ इंच (७१.१ सें.मी.) असते. स्टम्प्स सारख्या उंचीच्या व समान आकाराच्या असतात. त्यांच्यामधून चेंडू पलीकडे जाणार नाही.

  • दोन विकेट्समध्ये २२ यार्ड अंतर असते. विकेट्स एकमेकांसमोर व समांतर असतात.
  • बेलची लांबी ४ इंच (११.१ सें.मी.) असते.
  • स्टंप्सवर आडवी ठेवल्यावर स्टम्प्सच्यावर बेलची उंची  इंचापेक्षा (१.३ सें.मी.) अधिक असणार नाही.
  • (जोरदार वारा असेल‚ तर पंचांच्या संमतीने स्टम्प्सवर बेल्स न ठेवण्याबाबत कप्तान निर्णय घेऊ शकतात.)

बोलिंग व पॉपिंग क्रीज

स्टम्प्सच्या रेषेत दोन्ही बाजूंना एकूण ८ फूट ८ इंच (२.६४ मी.) लांबीची रेषा असते‚ तिला बोलिंग क्रीज (Bowling Crease) म्हणतात.

बोलिंग क्रीजच्या समोर खेळपट्टीवर बोलिंग क्रीजपासून ४ फूट (१.२२ मी.) अंतरावर बोलिंग क्रीजशी समांतर अशी रेषा असते तिला पॉपिंग क्रीज (Popping Crease) म्हणतात. पॉपिंग क्रीज विकेटच्या दोन्ही बाजूंना प्रत्येकी किमान ६ फूट (१.८३ मी.) वाढविलेले असते. पॉपिंग क्रीजच्या विकेटकडील कडेपासून स्टम्प्सच्या मध्यभागापर्यंत ४ फूट अंतर असते.

रिटर्न क्रीज (Return Crease)

बोलिंग क्रीजच्या दोन्ही टोकांशी लंबांतर रेषा काढून रिटर्न क्रीज आखलेले असते. या रेषा पॉपिंग क्रीजपर्यंत पुढे व विकेटच्या पाठीमागे किमान ४ फूट वाढविलेल्या असतात.

सीमारेषा (Boundary Line)

खेळपट्टीच्या मध्यबिंदूतून ७५ यार्ड (किमान ६० यार्ड) त्रिज्येने वर्तुळ काढतात. ही वर्तुळ रेषा हीच मैदानाची सीमारेषा होय. (वर्तुळ चुन्याने आखून त्यावर ठिकठिकाणी निशाणे लावावीत. चुन्याच्या रेषेऐवजी अलीकडे पांढऱ्या जाड दोराचा वापर केला जातो.)

क्रिकेट खेळपट्टीची निगा

सामना सुरू असताना खेळपट्टीवर पाणी मारता येणार नाही. खास नियमांची तरतूद केल्याशिवाय खेळपट्टीवर आच्छादन घालता येणार नाही. गोलंदाजाच्या धावमार्गावर आच्छादन घालता येईल. (पाऊस आल्यास खेळपट्टीचे संरक्षण करण्यासाठी खेळपट्टीवर आच्छादन घालतात.)

फलंदाजी करणाऱ्या संघाच्या कप्तानाची इच्छा असेल‚ तर प्रत्येक दिवशी खेळ सुरू होण्यापूर्वी अर्धा तास अगोदर रोलिंग करावे. (कप्तानाच्या विनंतीनुसार खेळ सुरू होण्यापूर्वी १० मिनिटे अगोदर रोलिंग संपेल‚ अशा पद्धतीने रोलिंग करावयास हरकत नाही.) त्या कप्तानाच्या इच्छेनुसार जड अगर हलका रोलर वापरावा.

नाणेफेक झाल्यानंतर लगेच किंवा सामन्याच्या कालावधीत खेळपट्टी कृत्रिमरीत्या सुकवावी लागली‚ तर त्या वेळी कोणता रोलर वापरावा याचा निर्णय पंच घेतील. त्या वेळी फक्त एक-दोन मिनिटेच रोलिंग केले जाईल.

दररोज खेळ सुरू होण्यापूर्वी आणि नवीन डाव सुरू होण्यापूर्वी पंचांच्या देखरेखीखाली अधिकाधिक ७ मिनिटे रोलिंग करता येईल.

सामना तीन किंवा अधिक दिवसांचा असेल‚ तर सामन्याच्या कालावधीत दररोज पंचांच्या देखरेखीखाली खेळ सुरू होण्यापूर्वी खेळपट्टीवरील हिरवळ कापली जाईल. सामन्याला सुटी असेल‚ तर त्या दिवशी हिरवळ कापली जाणार नाही. (तीनपेक्षा कमी दिवसांच्या सामन्यात हिरवळ कापली जात नाही.)

क्रिकेट बॅट

बॅटची लांबी ३८ इंचांपेक्षा (९६.५ सें.मी.) अधिक नसावी. बॅटची रुंदी ४.५ इंचांपेक्षा (१०.८ सें.मी.) अधिक नसावी. बॅट लाकडीच असावी.

क्रिकेट चेंडू

चेंडूचे वजन १५५.९ ग्रॅमपेक्षा कमी नसावे आणि १६३ ग्रॅमपेक्षा अधिक नसावे. चेंडूचा परीघ २२.४ सें.मी. पेक्षा कमी नसावा व २२.९ सें.मी. पेक्षा अधिक नसावा.

सामन्यात वापरावयाच्या चेंडूंना सामना सुरू होण्यापूर्वी पंच व कप्तान यांची मान्यता घ्यावी.

सामन्याच्या नवीन डावाच्या (Innings) सुरुवातीस क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाचा कप्तान नवीन चेंडू घेईल.

खेळात असलेला चेंडू हरवला किंवा खेळावयास योग्य राहिला नाही‚ तर सामान्यपणे तितकाच वापरलेला दुसरा चेंडू घेण्यास पंच परवानगी देईल. चेंडू बदलल्याची फलंदाजांना कल्पना दिली जाईल.

एका चेंडूने (तो हरवल्यामुळे किंवा खेळण्यास अयोग्य झाल्यामुळे त्याऐवजी घेतलेल्या चेंडूने) हिरवळ असलेल्या खेळपट्टीवर सलग किमान ८० षटके टाकल्यावर क्षेत्ररक्षक संघाचा कप्तान जुन्या चेंडूच्या जागी नवा चेंडू घेऊ शकतो. जुन्या चेंडूने षटक टाकणे सुरू असताना मध्येच नवा चेंडू घेता येईल. नवा चेंडू घेताच पंचाने नवा चेंडू घेतल्याचा इशारा करावा.

(खेळ सुरू नसताना – जलपान – उपाहार – चहापान – गडी बाद झाल्यावर – व्यत्यय आल्यास – चेंडू पंचाच्या ताब्यात राहील.)


क्रिकेट खेळाची सुरवात कशी करावी?

क्रिकेट खेळाडू

दोन संघांमध्ये सामना खेळला जातो. प्रत्येक संघातर्फे ११ खेळाडू खेळतात. त्यांपैकी एक कप्तान असतो. कप्तानाच्या अनुपस्थितीत उपकप्तान कप्तानाची जबाबदारी पार पाडतो. नाणेफेक करण्यापूर्वी संघातील खेळाडूंची नावे कप्तान सादर करतो. त्यामध्ये प्रतिस्पर्धी कप्तानाच्या संमतीशिवाय बदल करता येणार नाही.

सामना सुरू असताना जखमी किंवा आजारी खेळाडूबद्दल प्रतिस्पर्धी कप्तानाच्या संमतीने राखीव खेळाडूंपैकी बदली खेळाडू घेता येईल. बदली खेळाडूला फलंदाजी किंवा गोलंदाजी करता येणार नाही. बदली खेळाडू क्षेत्ररक्षण करू शकतो. विशिष्ट जागेवर क्षेत्ररक्षण करण्यास प्रतिस्पर्धी कप्तान (किंवा फलंदाजी करीत असलेला फलंदाज) त्याला मनाई करू शकत नाही. ज्या खेळाडूबद्दल बदली खेळाडू क्षेत्ररक्षणासाठी आला असेल‚ तो खेळाडू मैदानावर येताच बदली खेळाडू मैदानाबाहेर जाईल. बदली खेळाडूस यष्टिरक्षक म्हणून काम करता येणार नाही.

शक्यतो पूर्वी फलंदाजी केलेला खेळाडू फलंदाजासाठी पळण्याचे (Runner) काम करू शकतो. फलंदाजासाठी पळणारा (Runner) खेळाडू धावबाद झाला‚ त्याने चेंडू हाताळला किंवा झेल घेणाऱ्या क्षेत्ररक्षकास त्याने जाणूनबुजून अडथळा आणला (Obstruction)‚ तर फलंदाज बाद होतो. रनरने फलंदाजाप्रमाणे बाह्य उपकरणे वापरणे आवश्यक आहे.

सामन्यातील डाव (Innings)

सामना सुरू होण्याच्या वेळेपूर्वी किमान १५ मिनिटे दोन्ही संघांचे कप्तान मैदानावर उपस्थित राहून नाणेफेक करतील. नाणेफेक जिंकणारा कप्तान फलंदाजी किंवा क्षेत्ररक्षण याची निवड करून आपला निर्णय प्रतिस्पर्धी कप्तानास सांगेल. एकदा सांगितलेला निर्णय बदलता येणार नाही.

प्रत्येक संघाला आळीपाळीने दोन डाव खेळता येतात. परंतु पाच दिवसांच्या कसोटी सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने प्रतिस्पर्धी संघाच्या पहिल्या डावातील धावसंख्येपेक्षा २०० किंवा अधिक धावांनी आघाडी मिळविली असेल‚ तर दुसऱ्या डावात फलंदाजी करण्याचा आपला हक्क राखून प्रतिस्पर्धी संघास दुसऱ्या डावात फलंदाजी करण्यास भाग पाडता येते. (Follow on)

फॉलो-ऑन देण्यासाठी तीन किंवा चार दिवसांच्या सामन्यात १५० धावांची आघाडी‚ दोन दिवसांच्या सामन्यात १०० धावांची आघाडी मिळावी लागते.

प्रतिकूल हवामानामुळे सामना उशिरा सुरू झाला‚ तर प्रत्यक्ष खेळाच्या दिवसांच्या संख्येवरून धावांचे आधिक्य विचारात घेऊन फॉलो-ऑन दिला जातो.

फलंदाजी करणाऱ्या संघाचा कप्तान आपल्या संघाचे सर्व गडी बाद झाले नसताना केव्हाही डाव संपल्याचे जाहीर करू शकतो. (Declaration)

ज्या संघाची पहिल्या डावातील धावसंख्या प्रतिस्पर्धी संघाच्या दोन्ही डावांतील एकूण धावसंख्येपेक्षा अधिक असते‚ त्या संघाला दुसरा डाव खेळण्याची आवश्यकता नाही.

खेळाची सुरुवात‚ मध्यंतर व शेवट

प्रत्येक दिवशी कसोटीसाठी ६ तासांचा खेळ होईल. (खेळ सुरू झाल्यापासून उपाहारापर्यंत २ तास‚ उपाहारानंतर चहापानापर्यंत दोन तास आणि चहापानानंतर  दोन तास खेळ होईल.)

सहा तासांच्या खेळात कोणताही व्यत्यय न आल्यास किमान ९० षटके खेळ व्हावा. परंतु सहा तासांपेक्षा कमी वेळात ९० षटके पूर्ण झाली‚ तरी वेळ पूर्ण होईपर्यंत खेळ पुढे सुरू राहील. निर्धारित वेळेत ९० षटके टाकून झाली नाहीत आणि सूर्यप्रकाश स्वच्छ असेल‚ तर षटके पूर्ण होण्यासाठी पंच आपल्या अधिकारात ३० मिनिटांपर्यंत खेळ पुढे सुरू ठेवू शकतात. प्रत्येक दिवशी खेळ सुरू होताना‚ नवीन डाव सुरू होताना व मध्यंतरानंतर पुन्हा खेळ सुरू होताना‚ गोलंदाजाच्या बाजूकडील पंच प्ले (Play) (सुरू) असे म्हणेल आणि खेळ सुरू होईल. दोन्ही संघांना खेळ सुरू होत आहे‚ असे स्पष्ट समजेल‚ अशा पद्धतीने पंचाने ‘प्ले’ म्हणून सांगावे. प्ले म्हटल्यानंतर एखाद्या संघाने खेळावयास नकार दिला‚ तर तो संघ पराभूत झाला‚ असे समजावे. पंचाने ‘प्ले’ म्हटल्यानंतर गोलंदाजाला सरावासाठी खेळपट्टीवर चेंडू टाकता येणार नाही.

आहारासाठी (Lunch) ४० मिनिटांपेक्षा अधिक मध्यंतर असणार नाही. चहापानासाठी २० मिनिटांपेक्षा अधिक मध्यंतर असणार नाही. प्रत्येक दिवशी आहारासाठी व चहापानासाठी मध्यंतर होण्यापूर्वी साधारणत: एक तास अगोदर जलपानासाठी खेळ थांबेल. जलपानासाठी ४ मिनिटांपेक्षा अधिक अवधी मिळणार नाही.

(जलपान मैदानावर उरकून घ्यावे. जलपानासाठी खेळ थांबविण्याचं संघनायक नाकारू शकतात.) आहारासाठी‚ चहापानासाठी किंवा त्या दिवसासाठी खेळ थांबण्यास २ मिनिटांपेक्षा कमी वेळ राहिला असताना एखादा फलंदाज बाद झाला‚ तर खेळ थांबवावा. जलपानाच्या मध्यंतरास ५ मिनिटांपेक्षा कमी वेळ राहिला असताना फलंदाज बाद झाला‚ तर त्याच वेळी खेळ थांबवून जलपान उरकून घ्यावे. पुन्हा खेळ सुरू होईल तेव्हा ते षटक पूर्ण करावे.

षटक सुरू असताना वेळ संपली आणि त्या षटकात फलंदाज बाद झाला नसेल‚ तर षटक पूर्ण होऊ द्यावे. लेग-साइडला असलेला पंच गोलंदाजाच्या विकेटच्या मागे येऊन उभा राहिला‚ त्या वेळी मध्यंतरासाठी खेळ थांबविण्याची वेळ झाली नसेल‚ तर त्या बाजूने षटक पूर्ण झाल्यावर खेळ थांबेल.

बाद झालेल्या फलंदाजाच्या जागी येणारा नवीन फलंदाज २ मिनिटांच्या आत मैदानावर आला पाहिजे. (बाहेर जाणाऱ्या फलंदाजाने सीमारेषा ओलांडण्यापूर्वी आत येणारा फलंदाज मैदानात यावा.)

एक डाव संपल्यावर दुसरा डाव १० मिनिटांत सुरू व्हावा.

सामन्याच्या शेवटच्या दिवशी खेळाच्या वेळेचा एक तास शिल्लक राहिला असताना आणि सामन्याचा निकाल लागला नसताना क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघास १५ षटके टाकावी लागतील. (६ चेंडूंची १५ षटके) या एक तासाच्या वेळेत किमान १५ षटके टाकून संपली‚ सामन्याचा निकाल लागला नाही व अजूनही त्या तासातील वेळ शिल्लक असेल‚ तर वेळ संपेपर्यंत खेळ सुरू राहील. एका तासात १५ षटके टाकली गेली नाहीत आणि वेळ संपली तरी १५ षटके टाकावी लागतील. पावसामुळे किंवा अपुऱ्या प्रकाशामुळे खेळ काही वेळ थांबवावा लागला‚ तर त्या तासातील वाया गेलेल्या वेळासाठी ४ मिनिटास एक षटक संख्या कमी करावी. (१५ षटके टाकूनही सामन्याचा निकाल लागण्याची शक्यता नसेल‚ तर षटके पूर्ण होण्यापूर्वी खेळ थांबवण्याचा निर्णय दोन्ही कप्तान पंचांना सांगू शकतात.)

सामन्याच्या शेवटच्या एका तासाच्या वेळेत संघाचा नवीन डाव सुरू झाला तर डाव सुरू झाल्यापासून उपलब्ध असलेल्या वेळेत ४ मिनिटांस एक षटक याप्रमाणे षटके टाकावीत.

सामन्याच्या शेवटच्या षटकात फलंदाज बाद झाला व त्या वेळी वेळ संपली असली‚ तरी कोणत्याही एका कप्तानाच्या विनंतीनुसार ते षटक पूर्ण होऊ द्यावे आणि नंतर खेळ थांबवावा.

मध्यंतरासाठी व दिवसासाठी खेळ संपण्याची वेळ होताच किंवा सामना संपण्याची वेळ होताच पंच‘टाइम’ (Time) असे पुकारतील आणि त्याच वेळी दोन्ही विकेट्सवरील बेल्स काढून घेतल्या जातील.

सामन्याच्या शेवटच्या तासात एखादा गोलंदाज षटक पूर्ण करण्यास असमर्थ ठरला‚ तर ते षटक दुसऱ्या गोलंदाजाने पुरे करावे.

धावा काढणे (Scoring)

फलंदाजाने चेंडू मारल्यानंतर किंवा चेंडू खेळात असताना दोन्ही फलंदाजांनी आपल्या समोरील विकेटची टोके गाठली (फलंदाजाच्या शरीराचा अगर हातात धरलेल्या बॅटचा पॉपिंग क्रीजच्या आत स्पर्श झाला पाहिजे.)‚ तर एक धाव पूर्ण झाली‚ असे मानतात. फलंदाजाच्या बॅटला किंवा बॅट धरलेल्या मनगटाखालील हाताला लागून गेलेल्या चेंडूवर धावा काढल्या असतील‚ तर त्या धावा संबंधित फलंदाजाच्या नावावर जमा होतात. चेंडू बॅटला अगर बॅट धरलेल्या हाताच्या मनगटाखालील भागाला न लागता शरीराच्या अन्य भागाला लागला असेल किंवा चेंडूला कशाचाही स्पर्श झाला नाही आणि अशा वेळी धावा काढल्या गेल्या असतील‚ तर त्या अवांतर धावा म्हणून गणल्या जातात. अवांतर धावा फलंदाजांच्या नावावर जमा होत नाहीत.

धावा काढताना एका किंवा दोन्ही फलंदाजांनी टोक न गाठताच उलट पळून दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला‚ तर त्या खुरट्या धावेबाबत (Short run) पंच इशारा करील आणि ती धाव मोजली जाणार नाही. पहिली खुरटी धाव घेऊन दुसरी धाव पुरी केली‚ तर फक्त दुसरी धाव मोजली जाईल. चेंडू ‘डेड’ होताच पंच आपला हात वरच्या बाजूस वाकवून‚ हाताच्या बोटांनी आपल्या खांद्याला स्पर्श करून गुणलेखकाला खुरट्या धावेबाबत इशारा करील.

जी धाव काढताना फलंदाज धावबाद झाला असेल‚ ती धाव मोजली जाणार नाही. तसेच फलंदाज झेलबाद झाल्यास त्या वेळच्या धावा मोजल्या जाणार नाहीत.

धाव किंवा धावा काढल्यानंतर फलंदाज ज्या टोकाकडे असतील‚ त्याच बाजूला ते राहतील. चौकार किंवा षटकार मारला असेल आणि त्या वेळी फलंदाजांनी धावून धावा काढण्याचा प्रयत्न केला असेल‚ तर मात्र त्यांनी आपापल्या टोकाला आले पाहिजे.

चौकार (Four)

खेळात असलेल्या चेंडूचा सीमारेषेला (Boundary line) किंवा सीमारेषेऐवजी वापरलेल्या दोराला स्पर्श झाला किंवा चेंडूचा मैदानात टप्पा पडून चेंडूने सीमारेषा ओलांडली‚ तर चार धावा (चौकार) झाल्या‚ असे मानतात. क्षेत्ररक्षकाच्या हातात चेंडू असताना किंवा त्याच्या शरीराच्या कोणत्याही भागाला चेंडूचा स्पर्श असताना क्षेत्ररक्षकाचा सीमारेषेला स्पर्श झाला किंवा त्याने सीमारेषा ओलांडली‚ तरीही चौकाराची नोंद होते.

चेंडू सीमापार होण्यापूर्वी फलंदाजांनी पळून चारपेक्षा अधिक धावा काढल्या असतील‚ तर त्या वेळी फक्त पळून काढलेल्या धावांची नोंद होईल. ओव्हर-थ्रोमुळे (Over Throw) चेंडू सीमापार झाला‚ तर त्याबद्दल चार धावा आणि फेकीच्या वेळेपर्यंत फलंदाजांनी पळून काढलेल्या धावा अशा एकूण धावा नोंदल्या जातील.

चेंडू सीमापार होताच पंच आपला हात छातीच्या पुढे उंचावून एका बाजूकडून दुसरीकडे आणि परत याप्रमाणे हलवून गुणलेखकाला चौकाराचा इशारा करतात.

षट्कार (Six)

फलंदाजाने मारलेल्या चेंडूचा पहिला टप्पा सीमारेषेच्या बाहेर पडला‚ तर सहा धावा नोंदविल्या जातात. चेंडूचा जमिनीला स्पर्श न होता क्षेत्ररक्षकाचा स्पर्श होऊन जरी चेंडू सीमारेषेच्या बाहेर पडला तरी षट्कार नोंदविला जातो. पंच आपले दोन्ही हात वर उभे करून गुणलेखकाला षट्काराच्या नोंदीचा इशारा करतात.

अवांतर धावा (Extra Run)

गोलंदाजाने टाकलेला चेंडू‘नो बॉल’ किंवा ‘वाइड बॉल’ नसेल‚ त्या चेंडूचा फलंदाजाच्या बॅटला किंवा शरीराला स्पर्श झाला नसेल आणि त्या चेंडूवर धावा काढल्या असतील‚ तर त्यांना ‘बाइज’ (Byes) असे म्हणतात.

गोलंदाजाने टाकलेल्या चेंडूचा फलंदाजाच्या बॅटला किंवा बॅट धरलेल्या हाताच्या मनगटाखालील भागाला स्पर्श न होता त्याच्या शरीराच्या अन्य भागाला किंवा कपड्याला स्पर्श झाला असेल व त्या चेंडूवर धावा काढल्या असतील‚ तर त्यांना ‘लेग बाइज’ (Leg byes) असे म्हणतात. (फलंदाजाने हेतुपूर्वक शरीराच्या भागाने चेंडू अडविण्याचा प्रयत्न केला असेल किंवा चेंडूला दिशा देण्याचा प्रयत्न केला असेल‚ तर लेग बाइज नाकारल्या जातात. फलंदाजाने बॅटने चेंडू खेळण्याचा प्रयत्न केलेला असेल आणि असे करूनही त्याच्या शरीराला किंवा कपड्याला चेंडूचा स्पर्श होऊन धावा झाल्या असतील‚ तर त्या मोजल्या जातात.)

पंच हात उंच करून‚ हाताची बोटे ताठ करून ‘बाय’ धावेचा इशारा करतील‚ लेग बायसाठी गुडघ्याला हात लावून इशारा केला जाईल.

गोलंदाजाने टाकलेला चेंडू‘नो बॉल’ किंवा ‘वाइड बॉल’ म्हणून पंचाने इशारा केला असेल‚ तर अशा चेंडूबद्दल एक अवांतर धाव मिळते. नो बॉल खेळून फलंदाजाने धावा काढल्या असतील‚ तर त्या धावा फलंदाजाच्या नावे जमा होतात. त्या वेळी नो बॉलसाठीही अवांतर धाव मिळते.

फलंदाजाने चेंडू मारला असेल व क्षेत्ररक्षकाने कॅप किंवा हॅटच्या साहाय्याने चेंडू अडवला‚ तटवला किंवा झेलला असेल‚ तर फलंदाजी करणाऱ्या संघाला पाच अवांतर धावा मिळतात. (खेळाडूच्या बॅटचा चेंडूला स्पर्श झाला असेल‚ तर पाच धावा त्याच्या नावे जमा होतील.) त्या वेळी फलंदाज बाजू बदलत नाहीत.

अवांतर धावा फलंदाजाच्या नावे जमा होत नाहीत.

षटक (Over)

सहा चेंडूंचे षटक असते. एका बाजूने गोलंदाजाने षटक टाकल्यानंतर व चेंडू खेळात नाही असे पाहिल्यावर गोलंदाजाच्या विकेटकडील पंच‘ओव्हर’ म्हणून षटक संपल्याचे जाहीर करतील. पुढील षटक दुसऱ्या बाजूने दुसरा गोलंदाज टाकतो.

गोलंदाज दोन्ही विकेट्सच्या बाजूने आलटून-पालटून षटके टाकतात. एका गोलंदाजाला कोणत्याही बाजूने कितीही षटके टाकता येतात; मात्र एकाच डावात एका गोलंदाजाला सलग दोन षटके टाकता येणार नाहीत.

गोलंदाजाने षटकात टाकलेले नो बॉल्स किंवा वाइड बॉल्स षटकात धरले जात नाहीत.

गोलंदाज षटक पूर्ण करण्यास असमर्थ असेल किंवा त्याच्या गोलंदाजीबद्दल त्या षटकात पुढे गोलंदाजी करण्यास त्याला मनाई केली असेल‚ सामन्याच्या शेवटच्या तासात गोलंदाज षटक पूर्ण करण्यास असमर्थ असेल‚ तर राहिलेले चेंडू दुसरा गोलंदाज टाकू शकतो.

नो बॉल (No ball)

गोलंदाजाने नियमाप्रमाणे गोलंदाजी केली नाही‚ तर गोलंदाजाच्या हातातून चेंडू सुटताच पंच ‘नो बॉल’ असे मोठ्याने जाहीर करतील आणि एक हात बाजूला जमिनीशी समांतर करून ‘नो बॉल’ असल्याचा इशारा करतील. (The ball must be bowled, not thrown.)

चेंडू टाकत असताना गोलंदाजाच्या पुढील पायाचा भाग पॉपिंग क्रीजच्या पाठीमागे जमिनीवर किंवा हवेत (Grounded or Raised) नसेल किंवा त्याच्या मागील पायाचा रिटर्न क्रीजला स्पर्श झाला असेल किंवा त्याचा मागील पाय रिटर्न क्रीजच्या आत नसेल‚ तर गोलंदाजाच्या विकेटजवळील पंच तत्काळ मोठ्याने ‘नो बॉल’ जाहीर करतील.

गोलंदाज सरळ येऊन गोलंदाजी करणार आहे (Over the wicket) की वळसा घेऊन गोलंदाजी करणार आहे (Round the wicket)‚ हे फलंदाजाला समजले पाहिजे. गोलंदाज उजव्या हाताने की डाव्या हाताने गोलंदाजी करणार आहे‚ हेही फलंदाजास समजले पाहिजे. त्यानंतर गोलंदाजाने पंचाला न सांगता गोलंदाजी करण्याच्या पद्धतीत (Mode of delivery) बदल केला‚ तर पंच तो चेंडू नो बॉल म्हणून जाहीर करतील.

गोलंदाजाने धावत येऊन गोलंदाजी (Bowling) न करता तो चेंडू चेंडूस तोंड देणाऱ्या फलंदाजाकडे (त्याला धावबाद करण्यासाठीसुद्धा) फेकला‚ तर तो चेंडू नो बॉल म्हणून जाहीर केला जाईल.

गोलंदाजाच्या हातातून चेंडू सुटत असताना ऑन साइडला (On side) पॉपिंग क्रीजच्या पाठीमागे दोनपेक्षा अधिक क्षेत्ररक्षक असतील‚ तर लेग-साइडच्या पंचाने तो चेंडू नो बॉल म्हणून जाहीर करावा.

गोलंदाजाच्या हातातून चेंडू सुटलाच नाही‚ तर तो नो बॉल म्हणून जाहीर करू नये. फलंदाज नो बॉल मारून धावा काढू शकतो. फलंदाजाने नो बॉल खेळून धाव काढली नाही‚ तर संघाला एक अवांतर धाव मिळते.

गोलंदाजी करताना गोलंदाजाच्या स्पर्शाने बोलिंगच्या बाजूची विकेट पडली‚ तर त्या वेळचा चेंडू नो बॉल होत नाही.

गोलंदाजाने चेंडू टाकण्यापूर्वी न खेळणाऱ्या फलंदाजाने क्रीज सोडले असेल व गोलंदाजाने विकेट पाडून त्याला बाद केले असेल‚ तर तो चेंडू नो बॉल धरला जात नाही. फलंदाज बाद झाला किंवा नाबाद राहिला‚ तरी तो चेंडू षटकात मोजला जात नाही.

जवळचे क्षेत्ररक्षक (सिली मिड्ऑन‚ सिली मिड्ऑफ) खेळपट्टीवर उभे असतील‚ तर त्या वेळी चेंडू नो बॉल म्हणून जाहीर करावा.

नो बॉल खेळणारा फलंदाज त्रिफळाचीत‚ झेलबाद किंवा यष्टिचीत (Stumped) असा बाद होत नाही. मात्र‚ दोघांपैकी कोणताही एक फलंदाज धावबाद होऊ शकतो. तसेच फलंदाजाने तो चेंडू हाताळला (Handled the ball)‚ दोनदा चेंडू मारला (Hit the ball twice) किंवा हेतुपूर्वक क्षेत्ररक्षकाला अडथळा आणला (Obstruction)‚ तर तो फलंदाज बाद होतो. नो बॉलवर फलंदाज बाद झाला‚ तर त्याचे श्रेय गोलंदाजाला मिळत नाही.

वाइड बॉल (Wide ball)

गोलंदाजाने टाकलेला चेंडू योग्य ठिकाणी पवित्रा (Guard) घेतलेल्या फलंदाजाच्या मारण्याच्या आवाक्याच्या बाहेर असेल (अति उंच किंवा अगदी बाजूला दूर) तर पंच तो चेंडू वाइड बॉल म्हणून जाहीर करतील आणि आपले दोन्ही हात खांद्याच्या रेषेत‚ जमिनीशी समांतर असे उचलून वाइड बॉलचा इशारा करतील.

फलंदाजाने वाइड बॉल मारला नाही‚ तर संघाला एक अवांतर धाव मिळते. वाइड पडलेला बॉल खेळून त्यावर फलंदाजाला धावा काढता येतात. (फलंदाज तो चेंडू खेळला‚ तर तो वाइड बॉल ठरत नाही.)

टाकलेला चेंडू फलंदाजासमोर थांबला‚ तर तो वाइड बॉल नव्हे. तो चेंडू फटकारून फलंदाज धावा करू शकतो.

वाइड दिलेल्या बॉलवर धावा काढताना दोघांपैकी एक फलंदाज धावबाद होऊ शकतो. तसेच फलंदाजाने तो चेंडू हाताळला‚ क्षेत्ररक्षकाला अडथळा आणला किंवा स्वयंचीत (Hit wicket) किंवा यष्टिचीत (Stumped) असा फलंदाज बाद होऊ शकतो.

लॉस्ट बॉल (Lost Ball)

आजच्या क्रिकेट मैदानांची सुस्थिती पाहता मैदानावर चेंडू हरवणे शक्य नाही. चौकार किंवा षटकार मारलेला चेंडू प्रेक्षकांमध्ये गेला व तो सापडत नसेल‚ तर त्या हरवलेल्या चेंडूइतकाच वापरलेला दुसरा चेंडू घेऊन खेळ पुढे सुरू होईल.

डेड बॉल (Dead Ball)

डेड बॉल म्हणजे खेळात नसलेला चेंडू. त्या चेंडूवर धावा काढता येत नाहीत किंवा फलंदाजाला बादही करता येत नाही.

गोलंदाजाने गोलंदाजी करून टाकलेला चेंडू शेवटी (Finally) यष्टिरक्षकाच्या हातात आला किंवा गोलंदाजाच्या हातात परत आला‚ तर त्या वेळी त्याला डेड बॉल म्हणतात. तसेच पुढील प्रसंगी चेंडू डेड झाला‚ असे मानले जाते:
१) चेंडू सीमापार झाला.
२) चेंडू फलंदाज किंवा पंच यांच्या कपड्यांत अडकला.
३) फलंदाज बाद झाला.
४) फलंदाज जखमी झाला.
५) पंचाने षटक संपल्याचे जाहीर केले.
६) पंचाने ‘टाइम’ घोषित केले.
७) फलंदाजाने चेंडू खेळण्यापूर्वी वाऱ्याने बेल्स पडल्या.
८) गोलंदाजाने चेंडू टाकण्यापूर्वी त्याच्या हातातून चेंडू खाली पडला किंवा हातातून चेंडू सुटला नाही.
९) फलंदाज तयार नसताना गोलंदाजाने चेंडू टाकला व फलंदाजाने चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला नाही.
१०) फलंदाजाला अडथळा आणून बाद करण्याचा प्रयत्न केला.
११) क्षेत्ररक्षकाने कॅप किंवा हॅटच्या साह्याने चेंडू अडवला‚ तटवला किंवा झेलला.
१२) गोलंदाजाच्या नियमबाह्य गोलंदाजीबद्दल पंचाने खेळात हस्तक्षेप केला.
१३) चेंडू हरवला.

डेड बॉल पुकारताच पंचाने आपले हात गुडघ्याजवळ मागे-पुढे हलवून इशारा करावा. गोलंदाज चेंडू टाकण्यासाठी धावावयास सुरुवात करतो त्या वेळी चेंडू खेळात येतो.


फलंदाज बाद होण्याचे प्रकार

विकेट पडणे

पुढील प्रसंगी विकेट पडली‚ असे समजतात :

१) चेंडूने स्टम्प किंवा स्टम्प्स उखडून खाली पडणे.

२) चेंडू हातात असताना त्या हाताने बेल्स किंवा स्टम्प्स पाडणे.

३) चेंडू खेळत असताना फलंदाजाच्या बॅटचा‚ चेंडूचा‚ शरीराचा किंवा कपड्याचा स्पर्श होऊन स्टम्प्सवरील बेल्स पडणे.

(चेंडूचा‚ बॅटचा‚ शरीराचा किंवा कपड्याचा विकेटला केवळ स्पर्श झाला म्हणून विकेट पडली‚ असे होत नाही. स्पर्श झाल्यानंतर किमान एक बेल स्टम्प्सवरून खाली आली पाहिजे किंवा किमान एक स्टम्प जागेवरून उखडली गेली पाहिजे.)

त्रिफळा उडणे (Bowled)

गोलंदाजाने टाकलेला चेंडू फलंदाजाच्या बॅटला अगर शरीराच्या कोणत्याही भागाला लागून किंवा बॅटला अगर शरीराला न लागता चेंडूने विकेट पडली‚ तर तो फलंदाज त्रिफळाचीत झाला‚ असे म्हणतात. (चेंडूचा विकेटला स्पर्श होऊन एक बेल किंवा बेल्स खाली पडल्या‚ तरच फलंदाज बाद होतो. केवळ चेंडूचा विकेटला स्पर्श झाला म्हणून फलंदाज बाद होत नाही. तसेच वेगवान वारा वाहत असताना बेल्स न वापरण्याचा निर्णय घेऊन खेळ सुरू असेल‚ तर फलंदाज त्रिफळाचीत झाला किंवा नाही‚ हे पंचाने ठरवावे.)

झेलबाद (Caught)

फलंदाजाच्या बॅटला अगर बॅट धरलेल्या मनगटाखालील हाताला‚ ग्लव्ह्जला लागून उडालेल्या चेंडूचा जमिनीला स्पर्श होण्यापूर्वी क्षेत्ररक्षकाने तो चेंडू हाताने पकडला‚ तर तो फलंदाज झेलबाद होतो. क्षेत्ररक्षकाच्या कपड्यात अगर यष्टिरक्षकाच्या पॅडमध्ये चेंडू सापडल्यास (Lodged) फलंदाज झेलबाद होतो.

क्षेत्ररक्षकाने कपडे किंवा अवैध साधनाच्या साहाय्याने चेंडू हेतुपूर्वक पकडल्यास फलंदाज नाबाद राहतो. अवैध मार्गाने फलंदाजास बाद करण्याचा प्रयत्न केला म्हणून फलंदाजी करणाऱ्या संघास पाच धावा बहाल केल्या जातात.

गोलंदाजाने टाकलेल्या चेंडूचा फलंदाजाच्या पॅडला प्रथम स्पर्श होऊन नंतर चेंडूचा बॅटला स्पर्श झाला असेल किंवा बॅटला स्पर्श झाल्यानंतर फलंदाजाच्या पॅडला स्पर्श झाला असेल आणि त्या चेंडूचा जमिनीला स्पर्श होण्यापूर्वी क्षेत्ररक्षकाने तो झेलला असेल‚ तर फलंदाज झेलबाद होतो.

फलंदाजाने मारलेल्या चेंडूचा जमिनीस स्पर्श न होता तो एका क्षेत्ररक्षकाच्या शरीराला लागून हवेत उडाला व तो त्या अगर दुसऱ्या क्षेत्ररक्षकाने हवेत झेलला‚ तर फलंदाज झेलबाद होतो.

झेल घेतेवेळी क्षेत्ररक्षकाचे दोन्ही पाय मैदानात पाहिजेत. सीमारेषेच्या बाहेर वाकून चेंडू झेलता येईल. चेंडू पकडल्यानंतर क्षेत्ररक्षक बाहेर गेला तरी चालेल.

चेंडू पकडलेल्या हाताचा जमिनीस स्पर्श झाला तरी चालतो.

फलंदाज झेलबाद होतो त्या वेळी काढलेल्या धावा मोजल्या जात नाहीत.

पायचीत (L.B.W.)

गोलंदाजाने टाकलेला चेंडू फलंदाजाने बॅट धरलेला मनगटाखालील हात (ग्लव्ह्ज) यांखेरीज दोन्ही विकेटमध्ये असणाऱ्या शरीराच्या अन्य कोणत्याही भागाला लागला आणि चेंडू शरीराच्या भागाला लागला नसता‚ तर विकेट पडली असती अशी पंचाची खात्री झाली‚ तर तो फलंदाज पायचीत झाला असा निर्णय दिला जातो.

अ) पुढील चार प्रश्नांची होकारार्थी उत्तरे मिळाली तरच फलंदाजाला पायचीत म्हणून बाद करावे.

१) त्या चेंडूमुळे विकेट पडली असती काय?

२) गोलंदाजाकडील विकेट व फलंदाजाकडील विकेट या सरळ रेषेत चेंडू पडला होता काय? किंवा चेंडू ऑफ-स्टम्पवर पडला होता काय?

३) हाताशिवाय फलंदाजाच्या शरीराच्या अन्य भागाने चेंडू अडविला गेला होता काय?

४) चेंडूचा स्पर्श झालेला शरीराचा भाग (Point of contact) चेंडूचा स्पर्श झाला त्या वेळी एका विकेटपासून दुसऱ्या विकेटपर्यंत काढलेल्या सरळ रेषेत होता काय? (ज्या ठिकाणी स्पर्श झाला‚ त्या भागाची उंची विचारात घेण्याची आवश्यकता नाही.)

ब) ऑफ-स्टम्पच्या बाहेरच्या बाजूचा चेंडू बॅटने मन:पूर्वक खेळण्याचा प्रयत्न (Genuine attempt) फलंदाजाने केला नाही व फलंदाजाच्या शरीराने तो चेंडू ऑफ स्टम्पच्या बाहेर अडवला गेला नसता तर विकेट पडली असती‚ अशी पंचाची खात्री पटल्यास व क्षेत्ररक्षकांचे अपील असल्यास फलंदाज पायचीत होतो. लेग स्टम्पच्या बाहेर चेंडू पडला असेल‚ तर पायचीत दिला जात नाही.

धावबाद (Run out)

चेंडू खेळात असताना धाव घेण्याच्या प्रयत्नात असणाऱ्या फलंदाजाच्या शरीराचा किंवा हातात धरलेल्या बॅटचा पॉपिंग क्रीजच्या आतील जमिनीशी प्रत्यक्ष संपर्क नसताना त्याच्याकडील विकेट पडली‚ तर तो फलंदाज धावबाद होतो.

धाव काढण्यासाठी फलंदाजांनी एकमेकांना ओलांडले असताना विकेट पाडली तर पाडलेल्या विकेटकडे धावणारा फलंदाज धावबाद होतो. त्यांनी त्या वेळी एकमेकांस ओलांडले नसेल‚ तर पडलेली विकेट सोडणारा फलंदाज धावबाद होतो.

फलंदाजाने मारलेल्या चेंडूला क्षेत्ररक्षकाचा स्पर्श न होता त्या चेंडूने समोरची विकेट पडली आणि त्या वेळी बाजूचा फलंदाज पॉपिंग क्रीजमध्ये नसला तरी तो बाद होत नाही.

जी धाव काढताना फलंदाज धावबाद होतो‚ त्यापूर्वी काढलेल्या धावा त्याच्या नावावर जमा होतात.

गोलंदाजाच्या हातातून चेंडू सुटण्यापूर्वीच नॉन-स्ट्रायकरने क्रीज सोडली असेल आणि त्या गोलंदाजाने ती विकेट चेंडूने पाडली‚ तर नॉन-स्ट्रायकर बाद होतो.

टाइम्ड आउट (Timed out)

फलंदाज बाद होताच त्याच्या जागी खेळावयास येणाऱ्या खेळाडूने दोन मिनिटांत मैदानावर आले पाहिजे. त्याने अकारण विलंब केला आणि प्रतिस्पर्धी संघाने अपील केले‚ तर गोलंदाजाच्या बाजूचा पंच त्या खेळाडूला बाद केल्याचा निर्णय देऊ शकतो.

यष्टिचीत (Stumped)

गोलंदाजाने टाकलेला चेंडू‘नो बॉल’ नसेल‚ तो चेंडू खेळण्यासाठी फलंदाज पॉपिंग क्रीज सोडून पुढे गेला असेल आणि चेंडूला अन्य क्षेत्ररक्षकाचा स्पर्श होण्यापूर्वी यष्टिरक्षकाने तो चेंडू पकडून विकेट पाडली असेल‚ तर फलंदाज यष्टिचीत होतो.

यष्टिरक्षकाच्या शरीराला लागून चेंडू विकेटवर आदळून विकेट पडली आणि त्या वेळी फलंदाज पॉपिंग क्रीजच्या पुढे असेल‚ तर फलंदाज यष्टिचीत होतो.

(फलंदाजाच्या बॅटला अगर शरीराला लागलेला चेंडू विकेटच्या पुढे असेल‚ तर यष्टिरक्षक चेंडू पकडून फलंदाजाला यष्टिचीत करू शकतो. चेंडू फलंदाजाच्या बॅटला अगर शरीराला लागला नसेल‚ तर तो चेंडू यष्टिरक्षकाने विकेटच्या मागे पकडला पाहिजे.)

स्वयंचीत (Hit wicket)

चेंडू खेळण्याच्या प्रयत्नात फलंदाजाच्या बॅटचा‚ शरीराचा किंवा कपड्याचा स्पर्श होऊन विकेट पडली‚ तर फलंदाज ‘हिट विकेट’ बाद होतो. फलंदाजाची कॅप किंवा हॅट विकेटवर पडून बेल्स पडल्या‚ तरी तो हिट विकेट बाद होतो.

चेंडू खेळून पहिली धाव काढण्यासाठी पळण्यास सुरुवात करताना फलंदाजाच्या बॅटचा‚ शरीराचा किंवा कपड्याचा स्पर्श होऊन विकेट पडली‚ तर फलंदाज हिट विकेट बाद होतो. मात्र‚ पुढील धावा काढण्यासाठी पळत असताना त्याच्या बॅटच्या‚ शरीराच्या किंवा कपड्याच्या स्पर्शाने विकेट पडली‚ तर फलंदाज नाबाद राहतो. धावबाद किंवा यष्टिचीत होण्याचे टाळण्याच्या प्रयत्नात फलंदाजाकडून विकेट पडली‚ तर तो नाबाद राहतो.

चेंडू हाताळणे (Handled the ball)

फलंदाजाने खेळलेला चेंडू विकेटवर जात असेल व त्या चेंडूने विकेट पडेल असे वाटल्याने फलंदाजाने तो चेंडू हाताने अडविला‚ तर तो फलंदाज बाद होतो. खेळलेला चेंडू स्थिर असेल व क्षेत्ररक्षकाच्या विनंतीनुसार फलंदाजाने तो चेंडू उचलून त्याच्याकडे दिला‚ तर फलंदाजाला बाद देऊ नये.

चेंडू दोनदा खेळणे (Hit the ball twice)

गोलंदाजाने टाकलेला चेंडू बॅटने अगर शरीराच्या कोणत्याही भागाने अडविल्यानंतर फलंदाजाने तो चेंडू पुन्हा धावा काढण्याच्या उद्देशाने फटकारला तर फलंदाज बाद होतो. मात्र‚ क्षेत्ररक्षकाने विनंती केल्यावर फलंदाजाने चेंडू बॅटने तिकडे ढकलला‚ तर फलंदाजाला बाद देऊ नये.

अडथळा (Obstructing the field) कोणत्याही फलंदाजाने झेल पकडणाऱ्या क्षेत्ररक्षकास जाणूनबुजून अडथळा आणला‚ तर तो चेंडू खेळलेला फलंदाज बाद होतो. धावा काढण्यासाठी पळत असताना नकळत अडथळा आला असेल‚ तर फलंदाजाला बाद केले जात नाही.

क्रिकेट अपील व निर्णय

क्षेत्ररक्षकाने / क्षेत्ररक्षकांनी‘How’s that?’ असे अपील केल्याशिवाय पंचाने फलंदाज बाद झाल्याचा निर्णय देऊ नये. गोलंदाजाने पुढील चेंडू टाकण्यापूर्वी किंवा खेळ थांबविण्यासाठी पंचाने ‘टाइम’ म्हणण्यापूर्वी अपील केले‚ तरच पंचाने त्या अपिलाची दखल घ्यावी.

निर्णय देण्याच्या बाबतीत संभ्रम निर्माण झाल्यास संबंधित पंच दुसऱ्या  पंचाशी विचारविनिमय करू शकतो. शंकानिरसन न झाल्यास फलंदाजाच्या बाजूने निर्णय दिला जातो.

यष्टिचीत‚ हिट विकेट व फलंदाजाच्या बाजूकडील (Striker’s end) धावबाद याबाबतचा निर्णय लेग – साइडचा पंच देईल. इतर पद्धतींनी फलंदाज बाद झाला असेल‚ तर त्याचा निर्णय गोलंदाजाच्या विकेटकडील पंच देईल.

आपण बाद झालो आहोत‚ अशा गैरसमजुतीने एखादा फलंदाज मैदान सोडत असेल‚ तर पंचाने त्याला खेळण्यासाठी परत बोलवावे.

फलंदाज बाद झाल्याचा निर्णय देताना पंच आपल्या हाताच्या बोटाची तर्जनी डोक्याच्या वर करतील.

फलंदाज त्रिफळाबाद‚ पायचीत‚ झेलबाद‚ यष्टिचीत किंवा हिट विकेट असा बाद झाला असेल‚ तर श्रेय गोलंदाजाला दिले जाते.

फलंदाजाची निवृत्ती

खेळताना फलंदाज जखमी झाला‚ आजारी झाला किंवा अपरिहार्य कारणामुळे फलंदाजी पुढे सुरू ठेवणे त्याला अशक्य झाले; तर तो केव्हाही निवृत्त होऊ शकतो. त्याच्या संघातील फलंदाज बाद झाल्यावर प्रतिस्पर्धी कप्तानाच्या अनुमतीने तो परत खेळावयास येऊ शकतो.


गोलंदाजी व क्षेत्ररक्षण

गोलंदाजाशिवाय अन्य कोणाही क्षेत्ररक्षकाला चेंडूची चकाकी वाढविण्यासाठी चेंडू पॉलिश करता येणार नाही.

(क्षेत्ररक्षक कपड्यावर चेंडू घासू शकतात.) गोलंदाजासह कोणाही क्षेत्ररक्षकास चेंडू हिरवळीवर किंवा मैदानावर घासून चेंडूची स्थिती (Condition) बदलण्याचा प्रयत्न करता येणार नाही. राळ‚ मेण किंवा तेलकट पदार्थ चेंडूस लावता येणार नाहीत. दवामुळे चेंडू ओला झाला असेल‚ तर कोरड्या टॉवेलने तो पुसता येईल. चेंडूवर चांगली पकड धरता यावी म्हणून चेंडूच्या शिवणीचे टाके ढिले करता येणार नाहीत.

सामन्याच्या शेवटच्या तासात एखादा गोलंदाज आपले षटक पूर्ण करण्यास असमर्थ असेल‚ तर दुसरा गोलंदाज त्या षटकातील राहिलेले चेंडू टाकील.

षटक संपविण्यासाठी गोलंदाज अकारण विलंब करून वेळेचा अपव्यय करीत असेल‚ तर पंचाकडून प्रथम त्याला ताकीद मिळते. ताकीद देऊनही उपयोग झाला नाही‚ तर पंच कप्तानाला आदेश देऊन त्या गोलंदाजाला गोलंदाजी देण्यास प्रतिबंध करू शकतो. गोलंदाजी करण्यास गोलंदाजास प्रतिबंध केला‚ तर त्या डावात त्याला पुढे गोलंदाजी करता येणार नाही.

गोलंदाजाच्या पायांनी खेळपट्टीवरील डेंजर झोनचा भाग खराब होत असेल‚ तर गोलंदाजाला ताकीद दिली जाते. त्याचा परिणाम झाला नाही‚ तर ही बाब कप्तानाच्या आणि दुसऱ्या पंचाच्या निदर्शनास आणली जाते. याचाही परिणाम झाला नाही‚ तर पंच ‘डेड बॉल’ पुकारून संबंधित गोलंदाजाचे षटक संपल्याचे जाहीर करील व त्या गोलंदाजाला गोलंदाजी न देण्याचा आदेश कप्तानाला दिला जाईल. त्याला त्या डावात पुन्हा गोलंदाजी करता येणार नाही. विकेट समोर पॉपिंग क्रीजपुढील खेळपट्टीवरील पॉपिंग क्रीजपासून ५ फूट लांब आणि ३ फूट रुंद असणाऱ्या क्षेत्राला डेंजर झोन म्हणतात.

सातत्याने आखूड टप्प्याचे वेगवान चेंडू टाकून‚ फलंदाजाच्या खांद्यापेक्षा उंच उडवून त्याच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण करणाऱ्या गोलंदाजाविरुद्ध पंच कारवाई करू शकतो. अशा तऱ्हेने गोलंदाजी करणाऱ्या गोलंदाजाला गोलंदाजाच्या विकेटकडील पंच ताकीद देईल. ताकीद देऊनही उपयोग झाला नाही‚ तर ही बाब दुसरा पंच व कप्तान यांच्या निदर्शनास आणली जाईल. यानंतरही पूर्वीप्रमाणेच गोलंदाजी सुरू राहिली तर पंच चेंडू ‘डेड’ म्हणून जाहीर करतील आणि ते षटक संपवतील. त्या गोलंदाजाला गोलंदाजी न देण्याचा कप्तानाला हुकूम दिला जाईल. कप्तानाने हुकमाचे पालन केले पाहिजे. त्या गोलंदाजाला त्या डावात पुन्हा गोलंदाजी करता येणार नाही.

खेळ सुरू असताना क्षेत्ररक्षक पंचाला कल्पना देऊन मैदानाबाहेर जाऊ शकतो. त्याच्या जागी क्षेत्ररक्षणास आलेल्या बदली क्षेत्ररक्षकास विशिष्ट जागी क्षेत्ररक्षण करण्यास फलंदाजी करणाऱ्या संघाचा कप्तान किंवा त्याच्या वतीने फलंदाज मनाई करू शकत नाही. आठ मिनिटांपेक्षा अधिक वेळ मैदानाबाहेर गेलेल्या क्षेत्ररक्षकाला परत मैदानावर आल्यावर जितका वेळ तो मैदानाबाहेर होता किमान तितका वेळ गोलंदाजी करता येणार नाही. जखमी झाल्याने बाहेर गेलेल्या गोलंदाजास हा नियम लागू नाही. (दुसऱ्या दिवसाचा खेळ सुरू होताना या अटीचा अवलंब करता येणार नाही.) क्षेत्ररक्षक मैदानाबाहेर गेला किंवा मध्यंतरानंतर तो क्षेत्ररक्षणास मैदानावर आला नाही‚ तर ही बाब कप्तानाने पंचाच्या निदर्शनास आणून द्यावी.

क्षेत्ररक्षकाला शरीराच्या कोणत्याही भागाने चेंडू अडविता येईल. परंतु कॅप‚ हॅट इत्यादींच्या साह्याने चेंडू अडविता किंवा झेलता येणार नाही. तसा प्रयत्न केल्यास त्या कृतीबद्दल प्रतिपक्षास पाच धावा दिल्या जातात.

क्षेत्ररक्षकाला विश्रांती घेण्यासाठी मैदानाबाहेर जाता येणार नाही.

फलंदाज चेंडू खेळण्यास तयार असताना त्याचे अवधान विचलित होण्यासाठी आवाज करणे किंवा लज्जास्पद अभिनय करणे‚ असभ्य शिवराळ भाषेत शेरेबाजी करणे व खेळपट्टीजवळ (२२ यार्ड × १० फूट) हालचाल करणे नियमबाह्य आहे. फलंदाजाच्या बॅटला चेंडूचा स्पर्श होण्यापूर्वी अशी कृती घडली‚ तर पंच तो चेंडू नो बॉल म्हणून जाहीर करील.

धावा काढण्यासाठी धावणाऱ्या फलंदाजाला मुद्दाम अडथळा आणणे‚ गोलंदाजाला सहायक ठरेल अशा पद्धतीने खेळपट्टी खराब करणे‚ वेळेचा अपव्यय करणे इ. बाबी नियमबाह्य आहेत. क्षेत्ररक्षकांनी चेंडू एकमेकांकडे टाकत राहणे‚ षटक संपल्यावर किंवा डावऱ्या फलंदाजासाठी जागा बदलण्यास किंवा क्षेत्ररचना करण्यास अकारण विलंब लावणे इ. बाबी अयोग्य (Unfair) आहेत.

यष्टिरक्षक विकेटच्या मागे उभा राहील. गोलंदाजाने टाकलेल्या चेंडूचा बॅटला अगर फलंदाजाच्या शरीराला स्पर्श झाला‚ फलंदाजाने धाव घेण्याचा प्रयत्न केला; तरच यष्टिरक्षक विकेटच्या पुढील चेंडू पकडू शकतो. त्याच्या कृतीने फलंदाजाला व्यत्यय येऊ नये. क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघातील फक्त यष्टिरक्षकच ग्लव्ह्ज आणि पॅड्स यांचा वापर करू शकतो. यष्टिरक्षक जखमी झाल्याने पुढे खेळू शकत नसेल‚ तर अधिकृत ११ खेळाडूंपैकी १ खेळाडू यष्टिरक्षणाची जबाबदारी पार पाडील.


क्रिकेट सामन्याचा निकाल

एका संघाच्या दोन्ही पूर्ण (किंवा घोषित) डावांतील धावसंख्येपेक्षा दुसऱ्या संघाच्या अधिक धावा झाल्या असतील‚ तर अधिक धावसंख्या असणारा संघ सामना जिंकतो. (सामन्याचा निकाल सांगताना किती धावांनी सामना जिंकला / किती गडी राखून सामना जिंकला / एक डाव आणि किती धावांनी सामना जिंकला‚ हे सांगितले जाते.)

सामन्याचा निकाल लागला नाही‚ तर सामना अनिर्णित (Draw) राहतो. (सामन्याचा निकाल लागण्यासाठी सामन्याचा कालावधी संपल्यानंतर कोणत्याही संघाला पुढे खेळण्याची सक्ती करता येणार नाही.) सामना संपल्यावर दोन्ही संघांची धावसंख्या समान असेल‚ तर सामना बरोबरीत सुटतो.

क्रिकेट पंच

सामन्यासाठी तीन पंच असतील व एक सामनाधिकारी (मॅच रेफरी) असेल. मैदानावर दोन पंच असतील. सामनाधिकारी मैदानाबाहेर असेल. कप्तानाच्या अनुमतीशिवाय सामन्यामध्ये पंच बदलता येणार नाहीत. नाणेफेक झाल्यानंतर पंचांचे खेळपट्टीवर नियंत्रण राहील. हिरवळ कापणे‚ रोलिंग करणे या बाबी पंचांच्या देखरेखीखाली केल्या जातील.

खेळपट्टीवर खेळ सुरू ठेवणे धोकादायक आणि तर्कविसंगत आहे‚ असे पंचांचे मत बनल्यास खेळ तात्पुरता थांबविला जाईल व योग्य वेळी पुन्हा सुरू केला जाईल. (हिरवळ ओलसर आहे किंवा चेंडू भिजलेला आहे म्हणून खेळ थांबविता येणार नाही.) खेळपट्टीच्या स्थितीबाबत निर्णय घेण्याचे कप्तानांनी पंचांकडे सोपवले असेल‚ तर पंच खेळाडूंच्या अनुपस्थितीत वरचेवर मैदानाची पाहणी करतील आणि खेळपट्टी खेळण्यास योग्य बनताच संघांना खेळ सुरू करण्यास पाचारण करतील.

खेळपट्टी खराब झाल्याने‚ खेळण्यास अयोग्य बनल्यास खेळ थांबला असताना कप्तानांना न विचारता खेळपट्टी कृत्रिमरीत्या सुकविण्यासाठी पंच कार्यवाही करू शकतात. कृत्रिमरीत्या खेळपट्टी सुकविण्यासाठी उपाययोजना करणे किंवा १-२ मिनिटे रोलिंग करणे‚ हे पंचांच्या सूचनेनुसार व मार्गदर्शनानुसार होईल. पंचांनी खेळपट्टी सुकवून योग्य बनविण्याचा प्रयत्न केला‚ तरी ती खेळपट्टी खेळण्यास योग्य आहे किंवा नाही‚ हे उभय कप्तान ठरवतील. त्यांच्यात मतभेद असतील‚ तर पंच अंतिम निर्णय देतील.

अंधुक प्रकाशाविरुद्ध फलंदाजाने तक्रार केल्यास किंवा गोलंदाजाने चेंडूच्या स्थितीबद्दल तक्रार केल्यास पंच निर्णय देतील. खेळाडूंनी अपील केल्यावर पंचाने होकारात्मक किंवा नकारात्मक निर्णय दिला पाहिजे. अंधुक प्रकाशाबाबत क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघास अपील करता येणार नाही.

खेळाडूंच्या नियमबाह्य कृतीबद्दल पंच तत्काळ लक्ष पुरवतील आणि संबंधित खेळाडूंच्या गैरवर्तनाबद्दल योग्य दखल घेण्याची त्यांच्या कप्तानांना विनंती करतील.

खेळ सुरू करताना पंच‘प्ले’ असा इशारा करतील. षटक संपताच ‘ओव्हर’ असा इशारा दिला जाईल. मध्यंतरासाठी‚ दिवसासाठी किंवा सामना संपत असताना खेळ थांबत असेल त्या वेळी ‘टाइम’ असा इशारा करून बेल्स काढून घेतल्या जातील.

गोलंदाजाने टाकलेला चेंडू नियमबाह्य असेल (नो बॉल किंवा वाइड बॉल)‚ फलंदाजांनी खुरटी धाव घेतली असेल‚ चौकार किंवा षटकार मारला असेल‚ अवांतर धावा काढल्या असतील (बाय‚ लेग बाय)‚ फलंदाज बाद झाला असेल; तर पंच गुणलेखकाला योग्य इशारा करतील.

एक पंच गोलंदाजाकडील विकेटच्या मागे उभा राहतो व दुसरा पंच लेग – साइडला उभा राहतो. (लेग-साइडचा पंच फलंदाजाला व क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाच्या कप्तानाला सांगून ऑफ साइडला उभा राहू शकतो.) प्रत्येक संघाचा एक-एक डाव पूर्ण झाल्यावर पंच आपल्या बाजू बदलतात.

तिसरे पंच मैदानाबाहेर बसलेले असतात. ते अशा ठिकाणी बसलेले असतात की‚ त्यांना मैदानावरील सर्व हालचाली स्पष्ट दिसतात. त्यांच्यासमोर टी.व्ही. असतो. मैदानावरील पंचांना धावबाद‚ झेलबाद आणि यष्टिचीत याबाबत निर्णय देणे अवघड वाटेल किंवा निर्णय देण्याबाबत शंका निर्माण होईल त्या वेळी तिसऱ्या पंचाकडून निर्णय मागतात. मैदानाच्या विविध भागांत बसवलेल्या कॅमेऱ्यांच्या  साह्याने टी.व्ही.वर ती विशिष्ट परिस्थिती स्लो मोशनमध्ये पाहून फलंदाज बाद किंवा नाबाद ठरवतात व त्याप्रमाणे निर्णय देतात. फलंदाजाने मारलेल्या चेंडूवर चौकार की षट्कार असा संभ्रम निर्माण झाल्यास मैदानावरील पंच तिसऱ्या पंचाशी संपर्क साधून निर्णय मागवतो आणि त्याप्रमाणे तिसरा पंच निर्णय देतो. तिसऱ्या पंचाने दिलेला निर्णय अंतिम असतो.

क्रिकेट सामना अधिकारी (मॅच रेफरी)

‘क्रिकेट हा सभ्य माणसांचा खेळ आहे’‚ असे म्हटले जात असले तरी अलीकडे काही खेळाडू असभ्यपणाचे व अखिलाडू वृत्तीचे वर्तन करताना दिसतात. खेळाडूंच्या या बेजबाबदार आणि असभ्य वर्तनाला आळा घालण्यासाठी सामना अधिकाऱ्याची नियुक्ती केलेली असते. मैदानाबाहेर राहून खेळाडूंच्या हालचालींचे‚ वर्तनाचे ते बारकाईने निरीक्षण करतात. प्रतिस्पर्धी खेळाडूंचे अवधान विचलित करण्यासाठी‚ त्याला डिवचण्यासाठी असभ्य भाषेत शेरेबाजी करणे‚ शिवराळ भाषा वापरणे‚ असभ्य अंगविक्षेप करणे‚ निर्णयाबाबत पंचाशी हुज्जत घालणे इत्यादी बाबी क्रिकेट मैदानावर अपेक्षित नाहीत. अशा बाबींकडे त्यांचे खास लक्ष असते. पंचांशी विचारविनिमय करून तो खेळाडूच्या / खेळाडूंच्या असभ्य वर्तनाची खात्री करून घेतो. खेळाडूच्या / खेळाडूंच्या अपराधाचे गांभीर्य विचारात घेऊन तो शासन करू शकतो. अशा अपराधी खेळाडूवर / खेळाडूंवर पुढील एक किंवा अनेक सामने खेळण्यावर बंदी घालू शकतो.

क्रिकेट गुणलेखक

सामन्यासाठी एक किंवा दोन गुणलेखक असतात. फलंदाजांनी काढलेल्या धावा‚ अवांतर धावा‚ गोलंदाजांची गोलंदाजी‚ फलंदाज बाद होणे यांची नोंद गुणलेखकाने ठेवावयाची असते. गुणलेखकाला पंचांच्या इशाऱ्यांचा योग्य अर्थ समजला पाहिजे. पंचांचा इशारा मिळताच गुणलेखकाने इशाऱ्याची नोंद घेतल्याबद्दल परत इशारा करावा.


एक दिवसाचे क्रिकेट सामने माहिती

मर्यादित षटकांचे किंवा एक दिवसाचे क्रिकेट सामने प्रेक्षणीय व लोकप्रिय ठरत आहेत. क्रिकेटच्या नियमांत फारसा बदल न करता चेंडूचा रंग‚ खेळाडूंच्या कपड्यांचा रंग‚ क्रीडांगणाचा वापर‚ षटकांची संख्या‚ गोलंदाजी इ. बाबतींत काही बंधने घालून क्रिकेटरसिकांना सनसनाटी खेळ पाहून मनमुराद आनंद लुटता यावा याची जणू सोयच झाली आहे.

क्रीडांगणावरील बंधने (Field Restrictions)

क्रिकेटचे पूर्ण क्रीडांगण वापरले जाते‚ परंतु त्या क्रीडांगणातच एक लंबवर्तुळाकृती मर्यादित क्षेत्र आखण्यात येते. दोन्ही विकेटच्या मधल्या यष्टीपासून ३० यार्ड त्रिज्येने खेळपट्टीच्या दोन्ही बाजूंना (विकेटच्या मागे) दोन अर्धवर्तुळे आखली जातात. या अर्धवर्तुळांची टोके सरळ रेषांनी जोडली जातात.

फलंदाजांच्या फटकेबाजीमुळे गोलंदाजांची धुलाई होत असल्याने गोलंदाज नाउमेद होत व त्यांच्या गोलंदाजीची लयही बिघडत असे. फलंदाजी व गोलंदाजी यामध्ये समतोल राखण्यासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघटनेने एक दिवसाच्या क्रिकेट सामन्यासाठी काही नियम बदलले आहेत आणि ते ५ जुलै २०१५ पासून अमलात आले आहेत.    

दोन्ही संघांना प्रत्येकी ५० षटकांचा एक-एक डाव खेळता येतो. डावातील पहिल्या १० षटकांचा अनिवार्य पॉवर-प्ले पूर्ण होईपर्यंत क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाचे फक्त दोनच क्षेत्ररक्षक गोलंदाजाच्या हातातून चेंडू सुटेपर्यंत ३० यार्ड सर्कलच्या बाहेर उभे असतील. अकराव्या षटकापासून ४० षटके संपेपर्यंत ३० यार्ड सर्कलमध्ये गोलंदाज व यष्टिरक्षक यांच्याशिवाय पाच क्षेत्ररक्षक उभे असतील आणि चार क्षेत्ररक्षक ३० यार्ड सर्कलच्या बाहेर उभे असतील. ४१ ते ५० षटके संपेपर्यंत (किंवा डाव संपेपर्यंत) इनर सर्कलच्या बाहेर पाच क्षेत्ररक्षक असतील. (समालोचक ११ ते ४० षटकांच्या कालावधीतील खेळाला दुसरा पॉवर-प्ले आणि ४१ ते ५० षटकांच्या कालावधीतील खेळाला तिसरा पॉवर-प्ले असे संबोधतात.)

५० षटके पूर्ण होण्यापूर्वीच फलंदाजी करणाऱ्या संघाचे सर्व गडी बाद झाले‚ तर तेथेच त्या डावाचा खेळ थांबेल. दुसऱ्या संघाला पूर्ण ५० षटके खेळण्याची संधी राहील.

डावाच्या सुरुवातीस गोलंदाजी करणाऱ्या संघाला दोन नवे चेंडू गोलंदाजी करण्यासाठी उपलब्ध असतात. दोन्ही बाजूंकडून गोलंदाजी करण्यासाठी १-१ चेंडू वापरला जातो. (फटकेबाजीमुळे चेंडूचा आकार बदलल्याने चेंडू खेळण्यास अयोग्य बनला आहे‚ अशी पंचांची खात्री पटली‚ तर तितकाच वापरलेला दुसरा चेंडू घेण्यास पंच परवानगी देतील.)

एक दिवसाचे सामने दिवसा किंवा दिवस-रात्र पद्धतीने खेळविले जातात. दोन डावांमध्ये ३० मिनिटांची विश्रांती (मध्यंतर) राहील. डावामधील साधारण १ तास १० मिनिटांच्या अंतराने जलपानासाठी दोन वेळा खेळ थांबेल. जलपानासाठी चार मिनिटांपेक्षा अधिक वेळ घालवू नये.

अवांतर धावा

गोलंदाजाने टाकलेला चेंडू नो बॉल किंवा वाइड बॉल असेल‚ तर त्याबद्दल अवांतर धावा मिळतात. गोलंदाजाला अंडरहँड गोलंदाजी करता येणार नाही. असा टाकलेला चेंडू पंचाकडून नो बॉल म्हणून जाहीर केला जातो.

गोलंदाजाने टाकलेला चेंडू फुल टॉस असेल आणि फलंदाजाच्या कमरेपेक्षा अधिक उंचीवरून आला असेल तर तो चेंडू नो बॉल ठरतो.

गोलंदाज एका षटकामध्ये फलंदाजाच्या खांद्याच्या/डोक्याच्या वरून मागे जाणारे आखूड टप्प्याचे उसळते दोन चेंडू टाकू शकतो. असे दोन उसळते चेंडू टाकल्यावर पंच गोलंदाजाला तशी सूचना देतात. सूचना देऊनही गोलंदाजाने तिसरा उसळता चेंडू टाकला तर तो नो बॉल दिला जातो. पुढील कोणत्याही एखाद्या षटकात त्याच गोलंदाजाने तीन उसळते चेंडू टाकले तर तिसरा उसळता चेंडू नो बॉल म्हणून घोषित केला जातो. ही बाब पंच दुसऱ्या पंचाच्या आणि क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाच्या कप्तानाच्या निदर्शनास आणतात. तसेच त्या गोलंदाजाला अंतिम ताकीद देतात. त्याच गोलंदाजाने तिसऱ्यांदा एका षटकामध्ये तीन उसळते चेंडू टाकले तर तिसरा चेंडू नो बॉल दिला जातो.

पंच क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाच्या कप्तानाला बोलावून त्या डावात त्या गोलांदाजाला पुन्हा गोलंदाजी न देण्याची आज्ञा करतात. ते षटक अपूर्ण राहिले असेल तर अन्य गोलंदाज ते षटक पूर्ण करतो. कोणत्याही गोलंदाजाने कोणत्याही प्रकारे टाकलेला चेंडू पंचाने नो बॉल म्हणून घोषित केला तर त्या षटकातील पुढील चेंडूवर फ्री हिट मारण्याची संधी फलंदाजाला मिळते. फ्री हिट मारणारा खेळाडू त्या चेंडूवर त्रिफळाबाद/झेलबाद/पायचीत/यष्टिचीत पद्धतीने बाद होत नाही. फ्री हिट मारणारा खेळाडू धाव/धावा काढण्याच्या प्रयत्नात असेल तर तो फलंदाज किंवा त्याचा साथीदार धावबाद होऊ शकतो. (फ्री हिट मारणारा खेळाडू चेंडू हाताळणे/चेंडू दोनदा खेळणे/क्षेत्ररक्षकाला अडथळा करणे या पद्धतीने बाद होऊ शकतो.)

मैदानावर खेळत असलेला फलंदाज जखमी झाला तर त्याला मदतीसाठी‘रनर’ घेता येणार नाही.

पाऊस‚ अंधुक प्रकाश किंवा अन्य अपरिहार्य कारणांमुळे सामना उशिरा सुरू झाला‚ तर त्या प्रमाणात डावातील षटकांची संख्या कमी होईल. प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघापेक्षा दुसऱ्या संघास कमी षटके खेळावयास मिळाली‚ तर डकवर्थ-लुईस पद्धतीप्रमाणे दुसऱ्या संघाने करावयाची धावसंख्या निश्चित केली जाईल. प्रत्येक संघाला फलंदाजी करावयास किमान २० षटके मिळालीच पाहिजेत.

एकदिवसीय क्रिकेट सामन्याचा निकाल

दोन्ही संघ ५०-५० किंवा निर्धारित षटके खेळले‚ तर त्या संघांची एकूण धावसंख्या विचारात घ्यावी. अधिक धावसंख्या असणारा संघ विजयी होईल. सामन्यामध्ये दोन्ही संघांची धावसंख्या समान झाली तर डकवर्थ – लुईस पद्धतीने सामन्याचा विजयी संघ ठरविला जातो. स्पर्धेतील अंतिम सामना समान धावसंख्येवर संपला तर दोन्ही संघांची बरोबरी (Tie) झाली‚ असे मानले जाईल. (त्या वेळी कोणत्या संघाचे किती गडी बाद झाले होते याचा विचार करण्याची आवश्यकता नाही.) दोन्ही संघ संयुक्त विजेते ठरतील.

क्रिकेट सामना अधिकारी

एक दिवसाच्या सामन्यासाठी तीन पंच व मॅच रेफरी असे अधिकारी असतात. दोन पंच मैदानावर असतात आणि तिसरा पंच मैदानाबाहेर असतो. मैदानावर असलेले दोन पंच सामन्यावर नियंत्रण ठेवतात व नियमाप्रमाणे निर्णय देतात. मैदानाबाहेर असलेला तिसरा पंच अशा ठिकाणी बसलेला असतो की‚ त्याला मैदानावरील सर्व हालचाली स्पष्ट दिसतात. त्याच्यासमोर टी.व्ही. असतो. मैदानावरील पंचांना धावबाद‚ झेलबाद किंवा यष्टिचीत याबाबत निश्चित निर्णय देणे अवघड वाटेल किंवा निर्णय देण्याबाबत शंका निर्माण होईल‚ त्या वेळी ते तिसऱ्या पंचाकडे निर्णय मागतात. मैदानाच्या विविध भागांत बसवलेल्या कॅमेऱ्यांच्या साह्याने टी.व्ही.वर ती विशिष्ट परिस्थिती स्लो मोशनमध्ये पाहून फलंदाज बाद किंवा नाबाद ठरवतो आणि त्याप्रमाणे निर्णय देतो. फलंदाजाने मारलेल्या चेंडूवर चौकार की षटकार असा संभ्रम निर्माण झाल्यास मैदानावरील पंच तिसऱ्या पंचाशी संपर्क साधून निर्णय मागवितो आणि त्याप्रमाणे तिसरा पंच निर्णय देतो. तिसऱ्या पंचाने दिलेला निर्णय अंतिम असतो.

सामना अधिकारी (मॅच रेफरी) मैदानाबाहेर राहून खेळाडूंच्या वर्तनाचे निरीक्षण करतात. मैदानावर असभ्य व बेशिस्त वर्तन करणाऱ्या खेळाडूंवर दंडात्मक कारवाई करण्याचा त्याला अधिकार आहे.

एकदिवसीय क्रिकेट नवीन नियम

पूर्वी गोलंदाजाने चेंडू हातातून सोडल्यानंतर फलंदाज तो खेळायच्या आत क्षेत्ररक्षकांना कोणतीही लक्षणीय हालचाल करण्याची परवानगी नव्हती. नवीन नियमाप्रमाणे फलंदाज चेंडू खेळण्यापूर्वीच क्षेत्ररक्षक आपली जागा (Position) सोडून दुसऱ्या पोझिशनकडे जाऊ शकतो. गोलंदाजाने टाकलेला चेंडू फलंदाज कोणत्या दिशेला खेळेल याचा अंदाज घेऊनच त्याने आपली पोझिशन बदलणे आवश्यक आहे.


२०-२० षटकांचे क्रिकेट सामने माहिती

क्रिकेटरसिकांना गतिमान व सनसनाटी खेळ पाहावयास आवडत असल्याने एक दिवसाचे क्रिकेट सामने लोकप्रिय ठरले. सुमारे तीन-सव्वातीन तासांत संपणाऱ्या २०-२० षटकांच्या सामन्यांतील झंझावाती फलंदाजी पाहण्यासाठी प्रेक्षक अधिकच गर्दी करू लागले. २००७ मध्ये दक्षिण आफ्रिकेत पार पडलेल्या २०-२० षटकांच्या पहिल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेत टीम इंडियाने अजिंक्यपद मिळविले; त्यामुळे २०-२० षटकांच्या सामन्याचे आकर्षण अधिकच वाढले.

२०-२० षटकांच्या सामन्यासाठी एक दिवसाच्या सामन्यासाठी वापरले जाणारे मैदान वापरले जाते. एक दिवसाच्या सामन्यांच्या नियमांमध्ये काही बदल करून २०-२० षटकांचे सामने खेळविले जातात. दोन्ही संघांना प्रत्येकी २० षटके फलंदाजी करावयास मिळते. फलंदाजी करणाऱ्या संघाचे सर्व फलंदाज त्या डावात २० षटके संपण्यापूर्वीच बाद झाले‚ तर त्यांचा डाव तिथेच संपतो. २० षटके पूर्ण होईपर्यंत खेळ सुरू राहत नाही. नंतर फलंदाजी करणाऱ्या संघाने २० षटके संपण्यापूर्वीच प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने केलेली धावसंख्या पार केली‚ तर सामना तेथेच संपतो. २० षटके पूर्ण होईपर्यंत पुढे खेळण्याची आवश्यकता नाही.

काही अपरिहार्य कारणांमुळे सामना उशिरा सुरू झाला तर षटकांची संख्या वाया गेलेल्या वेळेच्या प्रमाणात कमी करावी लागते. त्या प्रमाणात गोलंदाजाने टाकावयाची षटके व पॉवर प्लेची षटके कमी होतात. प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाला २० षटके फलंदाजी करण्याची संधी मिळाली; परंतु व्यत्यय आल्यामुळे उर्वरित वेळेत दुसऱ्या संघाला फलंदाजीसाठी २० पेक्षा कमी षटके मिळतील. एका तासात १४-२८ षटके टाकणे आवश्यक असल्याने उर्वरित वेळेसाठी षटकांची संख्या निश्चित केली जाते आणि डकवर्थ – लुईस पद्धतीने विजयासाठी आवश्यक असणाऱ्या धावांची संख्या निश्चित केली जाते.

डावातील पहिल्या सहा षटकांसाठी क्षेत्ररक्षणावर बंधने असतात. सहा षटकांचा पॉवर-प्ले सुरू असताना गोलंदाजाच्या हातून चेंडू सुटतो‚ त्या वेळी क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाचे फक्त दोन क्षेत्ररक्षक ३० यार्ड सर्कलच्या बाहेर क्षेत्ररक्षणास उभे राहू शकतात.

ऑन साइडला (लेगसह) पाचपेक्षा अधिक क्षेत्ररक्षक असणार नाहीत. सातव्या षटकापासून पाच क्षेत्ररक्षकांपेक्षा अधिक क्षेत्ररक्षक इनर सर्कलच्या बाहेर असणार नाहीत.

२० षटकांचा डाव ७५ मिनिटांत संपला पाहिजे. ७५ मिनिटांत डाव पुरा झाला नाही तर क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघावर उरलेल्या प्रत्येक पूर्ण षटकामागे सहा धावांची दंडात्मक कारवाई केली जाते. म्हणजेच ७५ मिनिटांनंतर उर्वरित प्रत्येक पूर्ण षटकामागे फलंदाजी करणाऱ्या संघास सहा धावा बहाल केल्या जातात. (फलंदाजाकडूनही वेळेचा अपव्यय केला जातो. एखादा महत्त्वाचा निर्णय घेण्यासाठी तिसऱ्या पंचालाही अधिक वेळ लागू शकतो. काही वेळा प्रेक्षकांकडूनही खेळात व्यत्यय आणला जातो तसेच जखमी फलंदाजावर प्रथमोपचार या आणि अशाच कारणांमुळे झालेला वेळेचा अपव्यय लक्षात घेऊन पंच दंडात्मक कारवाईबाबत विचारपूर्वक निर्णय घेतात.)

क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाचा कोणताही गोलंदाज चारपेक्षा अधिक षटके गोलंदाजी करू शकणार नाही. ही चार षटके त्याने एकाच बाजूने टाकावीत‚ असे नाही. एखादा गोलंदाज षटक पूर्ण करण्यास असमर्थ ठरला‚ तर त्या षटकातील उरलेले चेंडू दुसरा गोलंदाज टाकील आणि ते षटक पूर्ण होईल. या षटकाची नोंद षटक पूर्ण करणाऱ्या गोलंदाजाच्या नावे केली जाईल.

गोलंदाजाने टाकलेला चेंडू नो बॉल किंवा वाइड बॉल असेल‚ तर अवांतर धाव/धावा मिळते/मिळतात. नो बॉल खेळून फलंदाजाने काढलेल्या धावा त्याच्या नावे जमा होतात. कोणत्याही गोलंदाजाने कोणत्याही प्रकारे टाकलेला चेंडू पंचाने नो बॉल म्हणून घोषित केला तर त्या षटकातील पुढील चेंडूवर फ्री हिट मारण्याची फलंदाजाला संधी मिळते. फ्री हिट मारणारा खेळाडू त्या चेंडूवर त्रिफळाबाद/झेलबाद/पायचीत/यष्टिचीत पद्धतीने बाद होत नाही. फ्री हिट मारणारा धाव/धावा काढण्याच्या प्रयत्नात असेल तर तो फलंदाज किंवा त्याचा साथीदार धावबाद होऊ शकतो. (फ्री हिट मारणारा खेळाडू चेंडू हाताळणे/चेंडू दोनदा खेळणे/क्षेत्ररक्षकाला अडथळा करणे अशा पद्धतीने बाद होऊ शकतो.)

२० षटकांच्या डावामध्ये दुसरा नवा चेंडू घेतला जाणार नाही. फटकेबाजीमुळे चेंडूचा आकार बदलला आणि त्यामुळे तो चेंडू खेळण्यास योग्य राहिला नाही‚ तर तितकाच वापरलेला दुसरा चेंडू घेता येईल. क्षेत्ररक्षकाने चेंडू कुरतडल्याचे लक्षात आले‚ तर तितकाच वापरलेला दुसरा चेंडू घेतला जातो. चेंडू कुरतडणाऱ्या खेळाडूवर शिस्तभंगाची कारवाई केली जाते. मैदानावर खेळणारा खेळाडू जखमी होऊ शकतो. जखमी फलंदाजाला ‘रनर’ उपलब्ध होऊ शकणार नाही.

पहिला डाव संपल्यानंतर १० मिनिटांनी दुसरा डाव सुरू होईल. डावामध्ये जलपानासाठी खेळ थांबणार नाही.

मैदानावरील पंचांना धावबाद‚ यष्टिचीत‚ झेलबाद याबाबतीत साशंकता वाटली‚ तर ते मैदानाबाहेर असलेल्या तिसऱ्या पंचाची मदत घेतात. तिसऱ्या पंचाने दिलेला निर्णय अंतिम असतो. फलंदाजाने फटकावलेला चेंडू चौकार आहे की षटकार याबाबतही पंचास संभ्रम असेल‚ तर तिसऱ्या पंचाची मदत घेतली जाते. मैदानाबाहेर असलेले मॅच रेफरी मैदानात चाललेल्या खेळाचे व खेळांडूच्या वर्तनाचे बारकाईने निरीक्षण करतात. अखिलाडू वृत्तीने वागणाऱ्या‚ गैरवर्तन करणाऱ्या खेळाडूवर शिस्तभंगाची कारवाई करण्याचा त्यांना अधिकार आहे.

ज्या संघाची धावसंख्या अधिक असेल‚ तो संघ विजयी ठरतो. दोन्ही संघांची धावसंख्या समान झाली‚ तर पेच (Tie) सोडविण्यासाठी पूर्वी पुढील पद्धतीचा अवलंब केला जात होता. दोन्ही संघांचे कप्तान आपापल्या संघातील पाच खेळाडूंची गोलंदाज म्हणून निवड करतील. प्रत्येक गोलंदाजाने फक्त एक चेंडू गोलंदाजी करावयाची असते. गोलंदाजी केली जाते‚ त्या वेळी फलंदाज विकेटसमोर नसतो. गोलंदाजाने टाकलेला चेंडू नो बॉल असेल आणि त्या चेंडूने विकेट पडली‚ तर त्याचा तो प्रयत्न विफल मानला जातो. अधिक विकेट पाडणारा संघ विजयी ठरतो.

स्पर्धेत पेच सोडविण्यासाठी नवीन नियमाप्रमाणे पुढील पद्धतीचा अवलंब केला जातो. दोन्ही संघांना प्रत्येकी एक षटक (Super Over) फलंदाजी करण्याची संधी मिळते. त्या षटकासाठी तीन फलंदाज फलंदाजी करू शकतात. फलंदाजी करणारे तीन फलंदाज आणि एक षटक गोलंदाजी करणारा गोलंदाज यांची नावे संबंधित संघाचा कप्तान पंचाकडे सोपवितो. षटकाचा खेळ सुरू असताना त्या षटकामध्ये एखादा फलंदाज बाद झाला‚ तर तिसरा फलंदाज त्याच्या जागी खेळावयास येतो. षटक संपण्यापूर्वीच पुन्हा एखादा फलंदाज बाद झाला‚ तर त्या संघाची फलंदाजी तिथेच संपते. अशा प्रकारे दुसऱ्या संघालाही एक षटक फलंदाजी करण्याची संधी मिळते. एक-एक षटकाच्या खेळीमध्ये अधिक धावा करणारा संघ विजयी होतो.

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *